पुणे : वाहनचालक परवाना काढण्यासाठी शहरात हडपसर, आळंदी रस्ता आणि सासवडजवळील दिवे घाट येथे चाचणी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) संबंधित ठिकाणी पायाभूत सुविधांचा विस्तार सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे शहरातील वाहनचालकांना परवाना काढण्यासाठी भोसरी येथील वाहनचालक प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र (आयडीटीआर) येथे जाण्याची गरज भासणार नसून, अर्जदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

आरटीओने या तिन्ही ठिकाणी विद्यमान सेन्सर-आधारित वाहन चाचणी सुविधेला पूरक उपाययोजनांची अंमलबजावणी करून मार्ग तयार करण्यास सुरुवात केली आहे. लवकरच या केंद्रांवर चाचणीची सुरुवात करण्यात येणार असल्याने परवाना वितरण प्रणालीतही वेग येणार आहे.

पुणे शहरातील शिकाऊ परवाना (लर्निंग लायसन्स) काढणाऱ्या वाहनचालकांची चाचणी कागदपत्रांची तपासणी संगमवाडी येथील परिवहन कार्यालयात केली जाते. मात्र, कायमस्वरूपी परवान्यासाठी, दुचाकी अर्जदारांना आळंदी रस्त्यावरील फुलेनगर आरटीओ कार्यालयात हजर राहावे लागते. तर, चारचाकी आणि इतर जड-अवजड वाहन परवाना अर्जदारांना भोसरीतील आयडीटीआर केंद्रात सेन्सर आधारित रस्त्यावर चाचणी देण्यासाठी जावे लागते. पुणे आरटीओच्या हद्दीसह पिंपरी-चिंचवड आरटीओतील अर्जदारांना देखील याच ठिकाणी वेळ दिली जात आहे. आयडीटीआर केंद्रावर मर्यादित चाचणी सुविधा असल्याने गर्दी होऊन पायाभूत सुविधांवर ताण येणे, विलंब आणि अर्जदारांना दिवसभर ताटकळत प्रतीक्षा करत रांगेत थांबावे लागते. प्रतीक्षा कालावधी वाढतो. पायाभूत सुविधांवर ताण पडत असून, अर्जदारांना दूरपर्यंत जावे लागत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुण्यात नवीन वाहन परवाना काढण्यासाठी वाहनचालकांची गर्दी कायम आहे. त्यामुळे सध्याची पायाभूत सुविधा अपुरी पडत असल्याने हडपसर, आळंदी रस्ता आणि सासवड येथील दिवे घाट या तीन ठिकाणी अत्याधुनिक केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रतीक्षेचा कालावधी कमी करून सुलभ आणि जलद सेवा देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. – स्वप्नील भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे