बारामती : बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष लढविणार असल्याने चौरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला असून, त्यांच्याविरोधात उमेदवार उभा करणे राट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने टाळले आहे.
इंदापूर येथील श्री शिवछत्रपती साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे माळेगाव कारखान्यामध्ये हा पक्ष कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष होते. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने ‘बळीराजा सहकार बचाव पॅनेल’ जाहीर केल्याने या कारखान्याची निवडणूक चौरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे ‘श्री नीलकंठेश्वर पॅनेल’, कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांचे ‘सहकार बचाव शेतकरी पॅनेल’ आणि कष्टकरी शेतकरी संघर्ष समितीचे पॅनेल यांच्यात लढत होणार आहे.
अजित पवार यांच्या श्री नीलकंठेश्वर पॅनेलने २१ उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामध्ये ब गटातून अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने उमेदवार उभा केलेला नाही. श्री नीलकंठेश्वर पॅनेलमध्ये विद्यमान संचालक बाळासाहेब तावरे, तानाजी कोकरे, योगेश जगताप, स्वप्निल जगताप, प्रताप आटोळे, नितीन सातव, संगीता कोकरे यांना उमेदवारी दिली आहे. विद्यमान अध्यक्ष केशवराव जगताप, मदन देवकाते, अनिल तावरे, सुरेश खलाटे यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने ‘बळीराजा सहकार बचाव पॅनेल’च्या माध्यमातून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत निष्ठेने काम करणाऱ्यांना उमेदवारी दिली आहे. माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांच्या ‘सहकार बचाव शेतकरी पॅनल’ने विद्यमान संचालक गुलाब गावडे, उपाध्यक्ष रमेश गोफणे यांच्यासह युवा सभासदांना उमेदवारी दिली आहे.
कष्टकरी शेतकरी संघर्ष समितीकडून आज, (१३ जून) रोजी उमेदवार जाहीर करण्यात येणार असल्याचे अरविंद बनसोडे यांनी सांगितले. या कारखान्याचे १९ हजार ६०० सभासद आहेत. २२ जून रोजी मतदान आणि २४ जून रोजी मतमोजणी होणार आहे.