पुणे : संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सासवडकडे मार्गक्रमण करत असताना रविवारी (२२ जून) दिवेघाट माथ्यावरील प्रवेश बंदीचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार आहे.

दिवेघाट मार्गाचे रुंदीकरण सुरू असून, अपघाताचा धोका लक्षात घेता, डोंगरमाथ्यावर सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. त्याचे उल्लंघन झाल्यास भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ नुसार कारवाई करण्यासंदर्भात पुणे शहर पोलीस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी हा प्रतिबंधात्मक आदेश प्रसृत केला आहे.

दिवेघाटात सध्या महामार्गाचे रुंदीकरण सुरू असून, डोंगरकड्यांवर खाचखळगे आणि निसरडी अवस्था निर्माण झाली आहे. डोंगराच्या कडांवरून दरडी कोसळण्याची शक्यता असून, हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे छायाचित्र टिपण्याबरोबरच रील्ससाठी डोंगरावर चढणाऱ्या व्यक्तींना जीवित धोक्याचा सामना करावा लागू शकतो. त्यानुसार २२ जून रोजी दिवसभर कोणत्याही नागरिकाला दिवेघाट माथ्यावर जाण्यास मनाई आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे. पालखी मार्गावर गर्दी, वाहतूक आणि भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असून, नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.