लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: तंत्रशिक्षण संचलनालयातर्फे सुरू असलेल्या तंत्रनिकेतनांतील पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेतील ऑनलाइन अर्जांसाठी ७ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रवेशांची गुणवत्ता यादी १४ जुलैला जाहीर करण्यात येणार आहे.
तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे तंत्रनिकेतनांतील पदविका अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया राबवण्यात येत आहे. या अभ्यासक्रमासाठी राज्यभरात एक लाखाहून अधिक जागा आहेत. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो. दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी सुरू झालेल्या या प्रवेश प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी ३० जूनची मुदत देण्यात आली होती. मात्र आता प्रवेश अर्जांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज करताना प्रथम तंत्रशिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यांनतर ऑनलाइन अर्ज करीत आवश्यक कागदपत्रांच्या छायाप्रती अपलोड कराव्यात. आतापर्यंत एक लाख १५ हजारांवर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र मिळण्यास होणारा उशीर विचारात घेऊन अर्ज भरण्याच्या मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती तंत्रशिक्षण विभागातील अधिकार्यांनी दिली.
आणखी वाचा-घरातील कोयता शेजाऱ्याला देण्यावरून पती-पत्नीची एकमेकांना मारहाण
नव्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना ७ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज भरून कागदपत्रांची पडताळणी करता येईल. तात्पुरती गुणवत्ता यादी १० जुलै जाहीर होईल. या गुणवत्ता यादीवरील आक्षेप ११ आणि १२ जुलैला नोंदवता येतील. अंतिम गुणवत्ता यादी १४ जुलैला जाहीर करण्यात येणार आहे.