पुणे : तब्बल दहा तास चाललेल्या मानाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीची शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास सांगता झाली. सनई चौघड्यांचे वादन, बॅण्ड पथके आणि ढोल ताशांचा गजर तसेच रांगोळीच्या आणि विविधरंगी फुलांच्या पायघड्या अशा पारंपारिक आणि भक्तीमय वातावरणात मानाच्या गणपतींना निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणांनी विसर्जन मार्ग  दुमदुमून गेला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : Ganapati Visarjan 2022 Live : आज निरोपाचा दिवस, महाराष्ट्रात गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांचा उत्साह!

हेही वाचा : गणेशभक्तांचे आकर्षण असणाऱ्या पुण्याच्या वैभवशाली विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ; मानाच्या गणपती विसर्जनाला विलंब

करोनानंतरच्या निर्बंधमुक्त वातावरणात दोन वर्षांनी विसर्जन मिरवणूक पार पडली.  मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीची आरती झाल्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला. राज्याचे उच्च  आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, खासदार गिरीश बापट, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, सचिन आहिर, माजी महापौर मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. दहा वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली. चांदीच्या पालखीमध्ये कसबा गणपती विराजमान होता.  कसबा गणपतीच्या पुढे प्रभात बॅंडने देशभक्तीपर गाणी वाजवून वातावरण प्रफुल्लीत केले. त्यानंतर कलावंत पथकातील कलाकारांचे वादन पाहून गणेशभक्त भारावले. रमणबाग, रुद्रगर्जना ढोल-ताशा पथकांच्या वादनाने दोन वर्षांतर लक्ष्मी रस्ता दुमदुमला. दुपारी सव्वातीनच्या सुमारास गणपती मिरवणुकीचे टिळक चौकात आगमन झाले.

हेही वाचा : पुणे : आठ तासात मानाच्या चार गणपतींचे विसर्जन

कसबा गणपती पाठोपाठ मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी मार्गस्थ झाला. श्रीची विलोभनीय मुर्ती चांदीच्या पालखीत विराजमान झाली होती. मिरवणुकीच्या अग्रभागी असलेल्या नगारावादनानाने वातावरणात भक्तीरस निर्माण केला. यानंतर न्यू गंधर्व बँड पथकाने गाणी वादन गणेशभक्तांची मने जिंकली. समर्थ प्रतिष्ठान, शिवमुद्रा या ढोल-ताशा पथकातील वादनाने वातावरणात रंग भरला. विष्णूनाथ हे शंख वादनाचे पथक मिरवणुकीचे आकर्षण ठरले. पुण्याचा राजा आणि गुलालाची मुक्त उधळण करण्यासाठी प्रसिद्ध असलेला मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मार्गस्थ झाला. गुरुजी तालीम मंडळाची मिरवणूक भक्तिरथातून काढण्यात आली. या रथातून फुलांच्या सजावटीसह विठ्ठल रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजांच्या प्रतिकृतीने सर्वांचे लक्ष वेधले. गर्जना आणि नादब्रम्ह ढोल-ताशा वादनाने वातावरणात चैतन्य निर्माण झाले. मिरवणुकीत गुलालाची मुक्तहस्त उधळण करण्यात आली.

हेही वाचा : पुणे : विसर्जन मार्गावर ध्वनिवर्धक, ढोल ताशांचा दणदणाट; आवाजाची तीव्रता मर्यादेबाहेर

 फुलांच्या आकर्षक सजावटीने साकारलेल्या श्री गजमुख रथात मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपती लक्ष्मी रस्त्यावर दाखल झाला. तो दाखल होताच त्याचे जल्लोषात स्वागत झाले. सनई आणि  नगारा वादनाने गणेशभक्त भारावून गेले. स्वरूपवर्धिनी, गजलक्ष्मी आणि गजर या ढोल-ताशा पथकांच्या वादनाने आसमंत दुमदुमला. फुलांनी सजवलेल्या मेघडंबरी रथातून मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा मिरवणुकीत सहभागी झाला. श्रीराम शिवमुद्रा, वज्र या ढोल-ताशा पथकांनी वाजवलेल्या तालावर गणेशभक्तांनीही ठेका धरला. रात्री नऊच्या सुमारास केसरीवाडा गणपती विसर्जन मिरवणुकीची सांगता झाली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farewell respected traditional devotion ganpati immersion procession pune print news ysh
First published on: 09-09-2022 at 21:30 IST