पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या लिपिक-टंकलेखक, कर सहायक या पदांच्या भरतीचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. लिपिक टंकलेखक संवर्गात मराठीसाठी १ हजार ६२, इंग्रजीसाठी १६ उमेदवारांची शिफारस करण्यात आली, तर कर सहायक पदासाठी २२५ उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.
एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. टंकलेखक भरतीमध्ये मराठी टंकलेखनामध्ये लातूर जिल्ह्यातील सूरज फडणीस यांनी राज्यातून आणि मागासवर्गीयातून प्रथम, राधिका गोलहार यांनी महिला गटातून प्रथम क्रमांक मिळवला. तर इंग्रजी टंकलेखनामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील विनायक वजरेकर यांनी राज्यात प्रथम क्रमांक, मनोहर माळी यांनी मागासवर्गीयांतून प्रथम क्रमांक आणि ज्योती काटे यांनी महिलांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला.
तसेच कर सहायक पदासाठीच्या भरतीचा निकालही जाहीर करण्यात आला. त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील राहुल जेंगठे यांनी राज्यातून आणि मागासवर्गीयांतून प्रथम क्रमांक, तर अहमदनगर जिल्ह्यातील रिंकल हाडके यांनी महिला गटातून प्रथम क्रमांक मिळवला. शिफारसपात्र उमेदवारांची शिफारस सक्षम प्राधिकरणाकडून तपासणी करण्याच्या अधीन राहून करण्यात आल्याचे एमपीएससीने नमूद केले.