पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वार्षिक उत्सवामध्ये चार वर्षांपूर्वी झालेल्या वादातून शिक्षकाला दंड, चामडी पट्ट्याने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना सहकारनगर भागात घडली. याबाबत हर्षवर्धन सुनील हरपुडे (वय २१, रा. तावरे कॉलनी, सहकारनगर) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी कुंदन सोनावणे, रुपेश खाडे, अमन शेख, हेमंत जाधव यांच्यासह चार ते पाच अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षवर्धन हरपुडे विधी शाखेत प्रथम वर्षात आहेत. सहकारनगर भागातील अध्यापक कॉलनीतील मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत ते मुलांना प्रशिक्षण देतात. टांगेवाला कॉलनी येथील रहिवासी हेमंत जाधव, कुंदन सोनावणे, अमन शेख हे शाखेत यायचे. चार ते पाच वर्षांपूर्वी शाखेच्या वार्षिक उत्सवामध्ये त्यांच्यामध्ये वाद झाल्यामुळे आरोपींनी शाखेत जाणे बंद केले होते.
दोन दिवसांपूर्वी हरपुडे नेहमीप्रमाणे शाखेत गेले होते. शाखा संपल्यानंतर मैदानाच्या बाजूला असलेल्या कट्ट्यावर ते बसले होते. त्या वेळी काही मुले हरपुडे यांचा शाखेतील सहकारी अमित हिरणवाळेला मारहाण करत होती. त्या वेळी हरपुडे यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर आरोपी हेमंत जाधव, कुंदन सोनावणे साथीदारांसह तेथे आले. कुंदनने चामडी पट्ट्याने तसेच रुपेशने मैदानावर पडलेल्या झाडाच्या फांदीने हरपुडे यांना बेदम मारहाण केली. कट्ट्यावर ठेवलेला लाकडी दंड हरपुडेंच्या पाठीत मारला. सहायक पोलीस निरीक्षक सी. पी. बेरड तपास करीत आहेत.