पुणे : राज्यातील पाचवी आणि आठवीसाठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा आणि मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार पाचवीला प्रत्येक विषयासाठी ५० गुण, आठवीला प्रत्येक विषयाची ६० गुणांची परीक्षा शाळा स्तरावर होणार आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना जूनमध्ये पुनर्परीक्षेची संधी दिली जाणार असून, पुनर्परीक्षेतही अनुत्तीर्ण झाल्यास विद्यार्थ्यांला त्याच वर्गात ठेवले जाईल. यंदापासूनच या कार्यपद्धतीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
शालेय शिक्षण विभागाने या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला. शिक्षण हक्क कायद्यातील कलम १६ नुसार, कोणत्याही बालकास त्याचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत एकाच वर्गात ठेवता येणार नाही किंवा त्यास शाळेतून काढून टाकता येणार नाही. मात्र, केंद्र सरकारने कलम १६ मध्ये सुधारणा करून पाचवी, आठवीसाठी वार्षिक परीक्षा अनिवार्य केली आहे. त्यानुसार राज्यातही पाचवी, आठवीसाठी परीक्षा लागू करण्यात आली आहे. विद्यार्थी वार्षिक परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करून परीक्षेच्या निकालानंतर दोन महिन्यांत पुनर्परीक्षा घेतली जाणार आहे. पुनर्परीक्षेतही अनुत्तीर्ण झाल्यास संबंधित विद्यार्थ्यांला पाचवी किंवा आठवीच्याच वर्गात ठेवले जाईल. मात्र, प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्यांला शाळेतून काढले जाणार नाही.
हेही वाचा >>>प्रदीप कुरूलकरचा जामीन अर्ज फेटाळला
पाचवीसाठी प्रथम भाषा, द्वितीय भाषा, तृतीय भाषा, गणित, परिसर अभ्यास भाग एक आणि भाग दोन, तर आठवीसाठी प्रथम भाषा, द्वितीय भाषा, तृतीय भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्रे हे वार्षिक परीक्षेसाठी असणार आहेत. पाचवीच्या प्रत्येक विषयाच्या परीक्षेसाठी तोंडी किंवा प्रात्यक्षिक परीक्षेसाठी दहा गुण, लेखी परीक्षेसाठी ४० गुण असे एकूण ५० गुण, तर आठवी तोंडी किंवा प्रात्यक्षिक परीक्षेसाठी दहा गुण, लेखी परीक्षेसाठी ५० गुण असे एकूण ६० गुण, असा गुणभार निश्चित करण्यात आला आहे. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार द्वितीय सत्रातील संकलित मूल्यमापन- दोन हे वार्षिक परीक्षा म्हणून संबोधण्यात येईल. मात्र संकलित मूल्यमापन एकचे मूल्यमापन प्रचलित सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार होईल. वार्षिक परीक्षा ही शैक्षणिक वर्षांच्या द्वितीय सत्रातील अभ्यासक्रम, पाठय़क्रम, अपेक्षित अध्ययन निष्पत्तीवर आधारित असेल. एप्रिलच्या दुसऱ्या आठवडय़ात शाळा स्तरावर वार्षिक परीक्षा आयोजित करावी लागेल. सत्राअखेरीस अन्य इयत्तांबरोबरच पाचवी आणि आठवीचा निकाल जाहीर करावा लागणार आहे. विद्यार्थी वार्षिक परीक्षेला अनुपस्थित राहिल्यास तो अनुत्तीर्ण समजला जाईल. मात्र, पुनर्परीक्षेची संधी दिली जाईल. विदर्भात जूनच्या दुसऱ्या आठवडय़ात, तर उर्वरित राज्यात जूनच्या पहिल्या आठवडय़ात पुनर्परीक्षा घेतली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
तीन स्तरावर समित्या..
वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षेचे सनियंत्रण आणि पर्यवेक्षणासाठी राज्यस्तर, जिल्हास्तर, तालुकास्तर, केंद्र स्तर अशा समित्या स्थापन कराव्या लागणार आहेत. या समितीची कार्येही निश्चित करण्यात आली आहेत.
वर्गोन्नतीसाठी निकष
’पाचवीसाठी प्रती विषय किमान १८ गुण (३५%), आठवीसाठी प्रती विषय किमान २१ गुण (३५%) प्राप्त करणे आवश्यक
’गुणपत्रकामध्ये श्रेणीऐवजी गुण. विद्यार्थी अनुत्तीर्ण होत असल्यास सवलतीचे कमाल १० गुण
’अनुत्तीर्ण झाल्यास किंवा परीक्षेस गैरहजर राहिल्यास पुनर्परीक्षेची संधी