पुण्यातील हडपसर येथील सिरम इन्स्टिटय़ूट कंपनीच्या मागील बाजूस असलेल्या गोसावी वस्ती येथील मोकळ्या जागेत आज सकाळी मॉर्निंग वॉक गेलेल्या व्यक्तीवर बिबट्याचा हल्ला झाल्याची घटना घडली आहे.या घटनेमुळे हडपसर परिसरात एकच खळबळ उडाली होती.मात्र अखेर आज रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घटना स्थळापासुन 100 मीटरच्या अंतरावर बिबट्याला पकडण्यात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे. संभाजी बबन आटोळे ही व्यक्ती आज सकाळी बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाली आहे.

    या घटनेबाबत वन परिक्षेत्र अधिकारी एस मुकेश जयसिंग यांच्याकडून माहिती जाणून घेतली असता ते म्हणाले की, आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आम्हाला फोन आला की,हडपसर येथील गोसावी वस्ती येथे वॉकिंगला गेलेल्या व्यक्तीवर बिबट्याने हल्ला केला आहे. त्यानंतर आम्ही घटनास्थळी दाखल झाल्यावर आसपासच्या परिसरामध्ये बिबट्याचा शोध घेतला.

मात्र काही केल्या शोध लागत नव्हता.त्यावर आज रात्री गस्त घालण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रात्री 8 च्या नंतर गस्त घातली. तेव्हा आम्हाला घटनास्थळापासून 100 मीटर अंतरावर असलेल्या दोन्ही घरांच्यामधील रस्त्यात बिबटय़ा असल्याचे दिसून आला.त्यावर आम्ही जाळी टाकून पकडण्याचा प्रयत्न केला.मात्र तरी देखील काही यश आले नाही. सर्व प्रयत्न करून देखील बिबटय़ाला पकडता येत नव्हते. त्यामुळे बेशुद्ध होण्याचे एक इंजेक्शन मारण्यात आल्यानंतर रात्री साडे अकराच्या सुमारास बिबट्यावर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. आता आम्ही त्या बिबटय़ाला जंगलात सोडणार असल्याचे त्यांनी सांगितले.