पुणे : नुकत्याच जाहीर झालेल्या ७१व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटासाठी देण्यात आलेला पुरस्कार वादग्रस्त ठरला आहे. राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेतील (एफटीआयआय) विद्यार्थी संघटनेने या चित्रपटासाठी पुरस्कार देण्याच्या निर्णयाचा निषेध केला आहे. या चित्रपटाला पुरस्कार देणे धोकादायक असल्याचे नमूद करून, यातून चित्रपटाच्या मुखवट्याआड केलेला प्रचार आपल्या बहुसंख्याकवादी, द्वेषपूर्ण उद्दिष्टांना पूरक असेल, तर त्याला पुरस्कार देण्याची राज्यकर्त्यांची भूमिका स्पष्ट होत असल्याची टीका करण्यात आली आहे.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘द केरळ स्टोरी’साठी सर्वोत्कृष्ट छायांकन आणि सुदीप्तो सेन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर ‘एफटीआयआय’च्या विद्यार्थी संघटनेने निवेदन प्रसिद्ध करून भूमिका मांडली आहे.

‘‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट नाही, तर ते एक शस्त्र आहे. मुस्लिम समुदायाला बदनाम करण्यासाठी आणि सामुदायिक सलोखा, शिक्षण आणि निषेध व्यक्त करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या केरळसारख्या संपूर्ण राज्याला खलनायक ठरवण्यासाठी बनवलेली ही खोटी कथा आहे. चित्रपटसृष्टी तटस्थ नाही. ती मोठ्या जनसमुदायावर प्रभाव टाकण्याचे शक्तिशाली साधन आहे.

सरकारमान्य संस्थेकडून अल्पसंख्याकांविरुद्ध चुकीची माहिती आणि भीती पसरवणाऱ्या चित्रपटांचा गौरव केला जातो, तेव्हा ती केवळ कलेला मान्यता राहत नाही. ती ‘हिंसे’लाही मान्यता ठरते. भविष्यातील हत्याकांड, सामाजिक बहिष्कार आणि राजकीय अन्याय यांची संहिताच लिहिली जाते. राष्ट्रीय पुरस्काराच्या माध्यमातून, ‘हा द्वेष स्वीकारार्ह आहे. हीच कथा आम्ही पुरस्कृत करतो,’ हाच संदेश देण्यात येतो आहे,’ असे एफटीआयआय विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष गितांजली साहू यांनी निवेदनाद्वारे सांगितले.

‘आमचे कौशल्य, आम्ही विश्वास ठेवत असलेली चित्रपटसृष्टी आणि आम्ही घेत असलेले प्रशिक्षण सरकारपुरस्कृत सांप्रदायिकतेचे साधन ठरावे, हे आम्हाला मान्य नाही. ‘इस्लामोफोबिया’ला योग्य ठरवणे, आम्ही स्वीकारणार नाही. विद्यार्थी म्हणून आम्ही आता गप्प बसणार नाही. चित्रपट क्षेत्रात अपप्रचार, द्वेष आणि फॅसिस्ट विचारधारा यांना पुरस्कृत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ‘द केरला स्टोरी’सारख्या ‘प्रचारा’ला पुरस्कार मिळणे याचा पुरावाच आहे. आम्ही विद्यार्थी आणि नागरिक म्हणूनही अशा चिथावणीला, हिंसेला स्पष्ट विरोध करत राहू’ असेही त्यांनी नमूद केले आहे.

राष्ट्रीय पुरस्काराच्या माध्यमातून, ‘हा द्वेष स्वीकारार्ह आहे. हीच कथा आम्ही पुरस्कृत करतो,’ हाच संदेश देण्यात येतो आहे. – एफटीआयआय विद्यार्थी संघटना.