हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार विसर्जनाच्या दिवशी राज्यात पुण्यासह विविध ठिकाणी पावसाचा अंदाज देण्यात आला होता. त्यानुसार काही ठिकाणी पाऊस झाला असला, तरी पुण्यात मात्र त्याने न बरसता लांबलेल्या विसर्जन मिरवणुकीला साथच दिली. पुण्यात ९ सप्टेंबरला सकाळी दहा वाजता सुरू झालेली मिरवणूक १० सप्टेंबरला संध्याकाळी संपली. या संपूर्ण कालावधीत कुठेही मोठा पाऊस झाला नाही.

विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज देण्यात आला होता. पुण्याचाही त्यात समावेश होता. मुंबई परिसर, ठाणे आणि कोकणात काही भागात, तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आदी भागांत पाऊस झाला. पुण्यात मात्र पावसाने हुलकावणी दिली. विसर्जनाच्या दिवशी सकाळपासूनच निरभ्र आकाश होते. दुपारी उन्हाचा पारा वाढला. संध्याकाळनंतर आकाशात तुरळक ढग जमा झाले. संध्याकाळी सातच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर ढग दिसून येत होते. मात्र, काही वेळातच ते निघून गेले. केवळ काही भागांत हलका शिडकावा झाला.

हेही वाचा : पुणे : चांदणी चौकातील जूना उड्डाणपूल पाडण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून प्रारूप आराखडा तयार

पाऊस येण्याची शक्यता असल्याने मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये त्याची धास्ती होती. मात्र, संपूर्ण मिरवणुकीत पाऊस न झाल्याने ढोल-ताशांच्या दणदणाटात भरच पडली. प्रत्येक चौकात पथकाचे रेंगाळणेही वाढले. पावसाची चिन्हे नसल्याने मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्यांची गर्दीही संध्याकाळनंतर वाढत गेली. त्यातूनच न बरसलेल्या या पावसाची लांबलेल्या विसर्जन मिरवणुकीला साथ मिळाल्याचे बोलले जाते. विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान पाऊस बरसला नसला, तरी पुढील तीन ते चार दिवस पुणे शहर आणि परिसरात पावसाची शक्यता कायम असल्याचे पुणे वेधशाळेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.