सरकार निवडणुकांना घाबरत आहे. निवडणुका घेण्याचे धाडस सरकारमध्ये नाही. त्यामुळेच काहीही कारण पुढे करून निवडणुका लांबणीवर टाकण्याचा त्यांचा आटापिटा सुरू आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी पिंपरी-चिंचवडला बोलताना केली. पालिका निवडणुकीसाठी दोनचा, तीनचा किंवा चारचा प्रभाग असला तरी जनमत पाठीशी असल्यानंतर काहीही फरक पडत नाही, असे ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यनोंदणीचा आढावा घेण्यासाठी जंयत पाटील शहरात आले होते. यानिमित्ताने काळेवाडी येथील ‘रागा पॅलेस’ या ठिकाणी पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी आमदार विलास लांडे, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महिलाध्यक्षा कविता आल्हाट आदी उपस्थित होते.

हेही वाचा >>> पुणे : महावितरणच्या धडक मोहिमेत सर्वाधिक वीजचोऱ्या बारामतीत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाटील म्हणाले, राज्यातील जनमत सरकारच्या विरोधात गेले असल्याची खात्री त्यांना झालेली आहे. त्यामुळे त्यांना इतक्यात निवडणुका नको आहेत. मात्र, लवकर निवडणुका व्हाव्यात, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी आहे. जेव्हा निवडणूक होतील तेव्हा पिंपरी चिंचवडला राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता येईल. पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे चांगले काम आहे. भाजपमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. राज्यात राष्ट्रवादीची सत्ता होती. तेव्हा राष्ट्रवादीत येण्याचे प्रमाण जास्त होते. मात्र, सत्तेतून जाताच हे प्रमाण कमी झाले आहे. जेव्हा पालिका निवडणुका जाहीर होतील, तेव्हा त्यांचा विचार पुन्हा बदलेल, असे वाटते. पालिका निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी करण्याबाबतचा निर्णय स्थानिक नेत्यांच्या शिफारशीनुसार घेतला जाईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले.