पुणे : ‘गुजराती समाज हा संघर्ष आणि वादविवाद यापासून दूर असल्याने तो देशात आणि देशाबाहेरदेखील अगदी सहजपणे एकरूप होतो. तसेच, सहज स्वीकारलादेखील जातो,’ असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले.
श्री पूना गुजराती बंधू समाजच्या वतीने जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटरचे उद्घाटन शहा यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. ‘गुजराती समाज वाद विवादापासून दूर राहत असल्याने सर्वच ठिकाणी एकरूप होतो. गेल्या ११२ वर्षांपासून श्री पूना गुजराती बंधू समाज ही संस्था सातत्याने पुण्याच्या समाज जीवनात एकरूप होऊन भरीव कार्य करीत आहे,’ असे शहा म्हणाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, श्री पूना गुजराती बंधू समाजाचे अध्यक्ष नितीन देसाई, जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटरचे कार्यकारी संचालक राजेश शहा, राजेंद्र शहा, जयंत शहा आदी या वेळी उपस्थित होते.
शहा म्हणाले, ‘देशात पुणे शहर हे ध्यान, तप, राष्ट्रवाद, सामाजिक चेतना यासाठी प्रसिद्ध आहे. स्वातंत्र्यलढ्याचा विचार आणि कृतिशीलतेचे नेतृत्व करण्याचे काम पुणे शहराने केले आहे. आयुष्याच्या सुरुवातीचा काही काळ पुण्यामध्ये भवानी पेठेत राहिलो आहे. त्यामुळे गुजराती समाजाकडून उभारण्यात येत असलेले कन्व्हेन्शन सेंटर कसे असेल, याची मला मोठी उत्सुकता होती. गुजराती बांधवांनी उभारलेली ही वास्तू देशातील सर्व गुजराती बांधवांना अभिमान वाटावा, अशीच आहे. समाज जीवनाशी संबंधित सर्व सुविधा येथे आहेत.’
‘२०४७ मध्ये भारत जगात पहिल्या क्रमांकावर’
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने ११ वर्षांमध्ये देशात अमूलाग्र बदल आणि परिवर्तन घडवून आणले. वीज, शौचालये, आरोग्य यांसारख्या मुलभूत सोयी-सुविधांपासून वंचित असलेल्या समाजाच्या जीवनात प्रकाश आणला आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत चांद्रयान मोहिमेपासून स्टार्ट अपपर्यंत, आरोग्यापासून शिक्षणापर्यंत, खेळापासून संशोधनापर्यंत अशा सर्वच क्षेत्रांमध्ये उत्तुंग भरारी घेत असून, २०४७ मध्ये म्हणजे स्वातंत्र्याच्या शताब्दीमध्ये भारत जगातील पहिल्या क्रमांकाचा देश होईल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
देशातून नक्षलवाद, दहशतवादाचा बीमोड
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नक्षलवाद आणि दहशतवादाचा बीमोड करण्यात येत असून, २०४७ च्या भारताचा पाया १४० कोटी जनतेच्या सोबतीने रचला जात आहे. काश्मीरमधील कलम ३७० हटविण्याचा निर्णय असो किंवा साडेपाचशे वर्षांहून अधिक काळ बंदिस्त असलेल्या रामलल्लाला सन्मानपूर्वक स्थापित करण्याची कृती, या सर्वांमधून पंतप्रधान मोदी यांचे नेतृत्व वारंवार सिद्ध होत आहे,’ असे शहा यांनी नमूद केले.
‘२०३६ मध्ये भारतात ऑलिंपिकसाठी प्रयत्न’
‘२०३६ मध्ये भारतात ऑलिंपिक स्पर्धा आयोजित करण्याचा प्रयत्न आहे. या स्पर्धेत पहिल्या दहा बक्षिसांवर भारत आपली मोहोर उमटवेल, या दृष्टीने आखणी सुरू आहे,’ असे अमित शहा यांनी सांगितले.