इंदापूर : उजनी धरणात ‘सकर’ किंवा ‘खरपा’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ‘हेलिकॉप्टर’ माशांमुळे धरणाच्या जैवविविधतेलाही धोका निर्माण झाला आहे. दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातील पेरू आणि ब्राझील या देशांमध्ये आढळून येणाऱ्या या माशांचा प्रसार देशात महाराष्ट्रासह बिहार, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि केरळ या राज्यांमध्ये झाल्याचे दिसून येते. ‘शोभिवंत मासे’ म्हणून मत्स्यालयांमध्ये ठेवले जाणारे हे मासे आता जैवविविधतेच्यादृष्टीने धोकादायक ठरू लागले आहेत.
हेलिकॉप्टर माशामुळे मच्छीमारांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. उजनी जलाशयात गेल्या काही वर्षांत हेलिकॉप्टर सकर मासा किंवा सकरमाऊथ आर्मर्ड कॅटफिश (प्टेरिगोप्लिख्थीस स्पीशीज) ही विदेशी प्रजाती जलसंपदेसाठी एक गंभीर समस्या ठरत आहे. या माशांच्या दोन प्रमुख जाती ‘प्टेरिगोप्लिख्थीस पार्डालीस’ आणि ‘प्टेरिगोप्लिख्थीस डिस्जंक्टिवस’ आता उजनी धरणासह देशातील विविध राज्यांमध्ये आढळून येत आहेत.
मुळात हे मासे दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातील पेरू आणि ब्राझील या देशांमध्ये आढळतात. आकर्षक रंग आणि शरीररचनेमुळे हे मासे ‘शोभिवंत मासे’ म्हणून मत्स्यालयांमध्ये ठेवले जात होते; परंतु जसजसे हे मासे मोठे होत गेले, तसतसे ते मत्स्यालयांत बसू न शकल्यामुळे अनेक प्राणीप्रेमींनी त्यांना नद्यांत, तलावांत किंवा नाल्यांत सोडून दिले. अशा प्रकारे या विदेशी माशांचा प्रसार भारतात महाराष्ट्रासह बिहार, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि केरळ या राज्यांमध्ये जलद गतीने झाला.
या माशांचे शरीर कठीण हाडांच्या कवचाने झाकलेले असून, त्यांना शोषक तोंड असल्यामुळे ते पाण्याच्या तळाशी चिकटून राहतात आणि तळातील जैवसंतुलन बिघडवतात. हे प्रामुख्याने शेवाळ, तळातील सेंद्रिय पदार्थ आणि काहीवेळा इतर माशांची अंडी खातात. त्यामुळे स्थानिक माशांच्या प्रजातींचे अस्तित्व धोक्यात आले आहे. ‘संशोधनानुसार या माशांना कमी प्राणवायू आणि प्रदूषित पाणी यांचाही उच्च सहनशीलपणा आहे. ते वर्षभर प्रजनन करू शकतात आणि त्यांच्या काटेरी पंखांमुळे जलपक्ष्यांनाही धोका निर्माण होतो.
काही ठिकाणी या माशांमुळे मच्छीमारांच्या जाळ्यांच्या नुकसानामुळे मत्स्यव्यवसायावरही वाईट परिणाम दिसून येतो. या आक्रमक प्रजातीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सजावटी माशांच्या व्यापारावर कठोर नियम लागू करणे आवश्यक आहे. तसेच स्थानिक भाषांमध्ये जनजागृती मोहीम राबवून विद्यार्थ्यांना, मत्स्यालय व्यवसायिकांना आणि नागरिकांना या माशांच्या पर्यावरणीय परिणामांची माहिती देणे गरजेचे आहे.’ असे मत्स्य अभ्यासक डॉ. रणजित मोरे यांनी सांगितले.
हेलिकॉप्टर ‘सकर’ मासा ही एक अत्यंत सहनशील आणि वेगाने प्रजनन करणारी प्रजाती आहे. स्थानिक माशांच्या अंड्यांवर आणि खाद्यसाखळीवर परिणाम करून ती जैवविविधतेचा समतोल बिघडवते. या माशांच्या व्यापारावर नियंत्रण आणि जनजागृती या संकटावर उपाय ठरू शकतात. -डॉ. रणजित मोरे, मत्स्य अभ्यासक, प्राणीशास्त्र विभाग, कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, इंदापूर, जि. पुणे</strong>
खाण्यास अयोग्य आणि विषारी असलेल्या या माशाला मासळी बाजारात मागणी नसते. तरीही कमी दराने व्यापारी मासळी खत तयार करण्यासाठी या माशांचा उपयोग करतात. या माशाच्या शरीरावर खवले विषारी असून, त्याच्या स्पर्शाने सूज येते. – डॉ. अरविंद कुंभार, प्राणीशास्त्र अभ्यासक