पुणे : उत्तराखंड, सिक्कीम यांसारख्या हिमालयीन पट्ट्यात वारंवार होणारे भूस्खलन, भूकंप, बर्फ वितळल्याने हिमनद्यांना येणाऱ्या पुरांमुळे धरणांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. वारंवार होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीची पूर्वकल्पना, त्यावर आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कसे नियंत्रण मिळविता येईल याबाबत शास्त्रज्ञांकडून अहोरात्र संशोधन करण्यात येत आहे. लवकरच यावरील संशोधन पूर्ण करून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन संस्थेकडून (सीडब्ल्यूपीआरएस) देण्यात आली.
गेल्या दोन ते तीन वर्षांत हवामान बदल झाला असून याचे परिणाम हिमालयीन भागात प्रामुख्याने दिसून येत आहेत. उत्तराखंड, सिक्कीमसारख्या डोंगराळ प्रदेशात भूस्खलन ही एक मोठी समस्या बनली आहे. भूकंप, हवामान बदलामुळे अचानक आणि कमी वेळात जास्त होणाऱ्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण होऊन धरण तसेच जलविद्युत प्रकल्पांना धोका निर्माण झाला आहे. गेल्या वर्षी झालेल्या घटनांमुळे तिस्ता नदीवरील धरण आणि इतर जलविद्युत प्रकल्पांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे पाणीपुरवठा आणि वीज निर्मितीवर परिणाम झाला आहे.
याबाबत बोलताना ‘सीडब्ल्यूपीआरएस’चे संचालक डॉ. प्रभातचंद्र म्हणाले, ‘सिक्कीम येथील तिस्ता नदीच्या महापुरामुळे मोठे नुकसान झाले असून, या ठिकाणी अभ्यासासाठी २० ते २५ अधिकाऱ्यांचा चमू पाठविण्यात आला आहे. याठिकाणी जलशास्त्रीय उपाय, संरचनात्मक काम करावे लागणार आहे.
याशिवाय, येथील धरणांत पाण्यासोबतच डोंगरातून सैल झालेले दगड, माती मोठ्या प्रमाणात वाहून येत आहे. त्यामुळे पाण्यासोबत हे दगड येऊ नयेत, याकरिता संस्था संरचनात्मक बांधणीचा अभ्यास सुरू आहे. पुढील वर्षभरात हे संशोधन पूर्ण होऊन बदलत्या हवामानानुसार उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येईल.’
संशोधनातील प्रमुख मुद्दे
- भूकंपीय सुरक्षा मूल्यांकन
- जलाशयातील स्फोटांच्या अंदाजासाठी विकसित प्रणाली
- उपकरणांच्या देखरेखीसाठी तांत्रिक मार्गदर्शन
- हायड्राॅलिक माॅडेलचा अभ्यास
- थ्रीडी स्केल माॅडेल वापरून चाचण्या
- जलाशयातील गाळ खाली बसण्याचे एकात्मिक गणितीय मॉडेल
- धरणात येणाऱ्या गाळाचे व्यवस्थापन
- गाळ निष्कासन क्षेत्राचे मॉडेल आणि अभ्यास
धरणातील पाणी सोडताना घळई आणि नदी प्रवाहविज्ञानाचा अभ्यास करण्यात येत आहे. त्यानुसार प्रयोगशाळेत चाचणी करून विश्लेषण केले जात आहे. तसेच ‘रिव्हर-मॉर्फोलॉजी’ गाळाची गतिशीलता आणि पूर व्यवस्थापन सल्ला, बांधकामांपूर्वी आणि काम करताना नदीच्या वर्तनाचे निरीक्षण, गाळ वाहतुकीचे गणितीय व भौतिक प्रारूप व पूरप्रवण भागासाठी उपाययोजनांबाबत अभ्यास करण्यात येत आहे. – डाॅ. प्रभातचंद्र, संचालक, सीडब्ल्यूपीआरएस.