लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : शहरातील पेठांमधील जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी पुण्यासाठी विशेष धोरण राबविण्यासाठी समिती स्थापन करण्याची मागणी कसब्याचे आमदार हेमंत रासने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून गृहनिर्माण आयुक्तांना कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आमदार रासने यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन ही मागणी केली. ‘शहरातील अनेक वाड्यांचे बांधकाम अतिशय जीर्ण अवस्थेत असून, नागरिकांना धोकादायक परिस्थितीत राहावे लागत आहे. प्रचलित नियमांमधील तांत्रिक अडथळ्यांमुळे वाड्यांच्या पुनर्विकास रखडलेला आहे. त्यामुळे मुंबई आणि ठाणे शहरात राबवण्यात आलेल्या धोरणानुसार पुण्यासाठी स्वतंत्र धोरण राबवण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात यावी. यासाठी संबंधित विभागाची उच्चस्तरीय बैठक आयोजित करून हजारो नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय सोडवण्याला गती देण्याची मागणी केली आहे’ असे आमदार रासने यांनी सांगितले.
या मागणीवर मुख्यमंत्री कार्यालयाकडून गृहनिर्माण आयुक्तांना कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शहर आणि कसबा मतदारसंघातील जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. पुण्यासाठी स्वतंत्र धोरण राबवण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच योग्य कार्यवाही होईल, असे रासने म्हणाले.