पुणे : राज्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. गुरुवार, १४ मार्चअखेर राज्यात ९८६ लाख टन उसाचे गाळप करून १०० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. मार्चअखेर हंगाम संपून १०५ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे. साखर आयुक्तालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, १४ मार्चअखेर राज्यातील १०३ खासगी आणि १०४ सहकारी, अशा २०७ साखर कारखान्यांनी दिवसाला सरासरी साडेआठ ते नऊ लाख टन क्षमतेने ९८६.५२ लाख टन उसाचे गाळप केले आहे. सरासरी १०.१४ टक्के साखर उताऱ्याने १०० लाख टन साखर उत्पादन झाले आहे. यंदाच्या हंगामात सुरू झालेल्या २०७ कारखान्यांपैकी ४३ कारखान्यांनी आपला हंगाम संपविला आहे.

साखर उत्पादनात कोल्हापूर विभागाने २६ लाख टन उत्पादनासह आघाडी घेतली आहे. त्या खालोखाल पुणे विभागात २१ लाख टन, सोलापूर विभागात १९ लाख टन, नगर विभागात १२ लाख टन, छत्रपती संभाजीनगर आठ लाख टन, नांदेड विभागात ११ लाख टन, अमरावती विभागात आठ हजार टन आणि नागपूर विभागात दोन हजार टन साखर उत्पादन झाले आहे. ऊसगाळप, साखर उत्पादन आणि उताऱ्यात कोल्हापूर विभाग आघाडीवर आहे.

हेही वाचा : पिंपरी : अखेर भोसरीतील कृत्रिम धावमार्ग खेळाडूंसाठी खुला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मार्चअखेर १०५ लाख टन उत्पादनाचा अंदाज

राज्यात यंदाच्या हंगामात २०७ साखर कारखाने सुरू झाले होते. आजअखेर ४३ कारखाने बंद झाले आहेत. अजूनही १६४ कारखाने सुरू आहेत. मार्चअखेर हंगाम जवळपास संपेल. हंगामाच्या सुरुवातीस ९० लाख टन उत्पादनाचा अंदाज होता. पण, सततच्या अवकाळी पावसामुळे ऊस आणि साखर उत्पादनात वाढ झाली. १०० टनांचा टप्पा पूर्ण केला आहे. मार्चअखेर १०५ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे, अशी माहिती वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (विस्मा) अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी दिली आहे.