पुणे : विसर्जन मिरवणुकीत स्पीकरचा आवाज कमी करण्यास सांगितल्याने एकास दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना हडपसर भागात घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली असून, साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हर्षल सुरेश घुले (वय २०, रा. मांजरी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी स्वप्नील उर्फ बिट्या संजय कुचेकर, कैलास संतोष घुले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बाळासाहेब वसंत घुले (वय ५०, रा. विठ्ठल मंदिराजवळ, मांजरी गावठाण) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हेही वाचा : जेजुरीच्या खंडोबा गडाला प्राप्त होणार ऐतिहासिक वैभव, विकास आराखड्यातून दुरुस्तीचे काम वेगात मांजरी भागात विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. स्पीकरचा आवाज मोठा असल्याने बाळासाहेब घुले आणि कुटुंबीयांनी आरोपींना आवाज कमी करण्यास सांगितले. त्यामुळे आरोपी हर्षल, स्वप्नील, कैलास चिडले. त्यांनी घुले, त्यांची पत्नी आणि शेजाऱ्यांना शिवीगाळ केली. स्पीकरचा आवाज कमी न झाल्याने घुले यांनी पोलीस नियंत्रण कक्षात तक्रार दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना समज दिली. काही वेळानंतर पोलीस तेथून निघून गेले. आरोपी हर्षल, स्वप्नील, कैलास यांनी घुले यांना पुन्हा शिवीगाळ केली. त्यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. दांडके उगारुन परिसरात दहशत माजविली. सहायक पोलीस निरीक्षक दाभाडे तपास करत आहेत.