पुणे : मराठी चित्रपटांना बहुपडदा चित्रपटगृहांमध्ये जागा मिळत नसल्याने त्यांचे खेळ नाट्यगृहांत आयोजिण्याच्या प्रयोगाला चांगलेच बळ मिळताना दिसत आहे. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात बुधवारपासून (२२ जानेवारी) दोन दिवस होणाऱ्या चित्रपट महोत्सवातील सर्व खेळ ‘हाउसफुल्ल’ झाले आहेत. पण, चित्रपटांसाठी नाटकांवर संक्रांत नको, असाही सूर उमटू लागला आहे.

नाट्यगृहात चित्रपट दाखविण्याचा प्रयोग पुण्यातच प्रथम काही महिन्यांपूर्वी झाला होता. तसेच, गेल्याच महिन्यांत यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ या चित्रपटाचा खेळ ‘हाउसफुल्ल’ झाला होता. नाट्यगृहामध्ये नाटकाचा प्रयोग नसेल, तेव्हा मराठी चित्रपट दाखविण्याची कल्पना प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात पुण्यानेच पुढाकार घेतला आहे. यापूर्वी झालेल्या प्रयोगाला चित्रपटप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यानंतर आता पुणे महापालिका प्रशासनाने दोन दिवसीय महोत्सवासाठी बालगंधर्व रंगमंदिर उपलब्ध करून दिले आहे. त्या अंतर्गत ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’, ‘धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज’ आणि ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ या तिन्ही चित्रपटांचे दोन दिवसांतील खेळ ‘हाऊसफुल्ल’ झाले आहेत.

हेही वाचा :“असंविधानिक पदनिर्मितीत महाराष्ट्र सर्वांत पुढे”, खासदार सुप्रिया सुळे यांची टीका

महोत्सवात दर खेळाला ४९ रुपये एवढेच तिकीट असल्याने रसिकांनी त्याला मोठा प्रतिसाद दिला आहे. बहुपडदा चित्रपटगृहांमध्ये चार जणांच्या कुटुंबाचा मराठी चित्रपट पाहण्याचा खर्च किमान एक हजार रुपयांच्या घरात जातो. त्यामुळे अनेक जण चित्रपटगृहांत जाऊन चित्रपट पाहणे टाळतात. त्या पार्श्वभूमीवर, ‘बालगंधर्व’मधील महोत्सवाची घोषणा झाल्यानंतर पुणेकरांनी रांगा लावून तिकिटे खरेदी केली. महोत्सव आणि प्रेक्षकसंख्या वाढल्याने तिकीट दरामध्ये सवलत, असा दुहेरी लाभ घेण्यासाठी चित्रपटप्रेमी सज्ज झाल्याची माहिती महोत्सवाचे आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी दिली.

पहिला प्रयोग पुण्यातच

रंगभूमीवर चित्रपटाचा खेळ आयोजिण्याचा पहिला प्रयोग ‘द बॉक्स’मध्ये झाला होता. यामध्ये संदीप सावंत दिग्दर्शित ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. त्यानंतर ‘कर्मवीरायण’ या चित्रपटाचेही १० खेळ याच स्थळी झाले. ‘प्रथम यालाही प्रतिसाद थंडच होता. पण, चित्रपटाबाबत चित्रपट पाहिलेल्या प्रेक्षकांनीच अन्यांना सांगून प्रेक्षकसंख्या वाढत गेली,’ असा अनुभव ‘द बॉक्स’चे संचालक, रंगकर्मी प्रदीप वैद्या यांनी सांगितला. आताही ‘द बॉक्स’मध्ये २७ ते ३० जानेवारीदरम्यान ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ आणि ‘नदी वाहते’ या दोन चित्रपटांचे मिळून सात खेळ होणार आहेत.

हेही वाचा : टोमॅटोचे भाव घसरले, शेतकरी हवालदिल

नाट्यगृहात चित्रपट दाखविणे हा आमचा उद्देश नाही, तर सध्याच्या व्यवस्थेत एक तिकीट विकले गेले, तरी चित्रपटगृहात चित्रपटाचा खेळ होईल याची शाश्वती नाही. अशा प्रेक्षकांना डोळ्यांसमोर ठेवून विषयाचे वेगळेपण, वलंयाकित नसलेले कलाकार ही वैशिष्ट्ये असलेल्या चित्रपटांना आम्ही स्थान देतो. – प्रदीप वैद्या, संचालक, ‘द बॉक्स’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पूर्वी एकपडदा चित्रपटगृह मोठ्या प्रमाणावर होती, तेव्हा मराठी चित्रपट तेथे मोठ्या संख्येने पाहिले जायचे. बहुपडदा चित्रपटगृहांत तसे होत नाही. मात्र, त्यामुळे नाट्यगृहांत चित्रपट दाखवायला सुरुवात झाली, तर तारखांवरून वाद होण्याचे प्रसंग उद्भवू शकतात. त्यामुळे नाट्यगृहांत चित्रपटाचे अतिक्रमण शक्यतो नको. – माधव अभ्यंकर, प्रसिद्ध अभिनेते