पुणे : प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करुन कात्रज चौकात आंदोलन केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी वसंत मोरे यांच्यासह शिवसैनिकांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
याबाबत पोलीस हवालदार सुनील हनवते यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना ठाकरे गटाचे शहर पदाधिकारी, माजी नगसेवक वसंत मोरे, प्रतीक कोडितकर, नितीन जगताप, ओंकार भोसले, अनिकेत खिरीड यांच्यासह २५ ते ३० शिवसैनिकांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज चौकात वसंत मोरे यांच्या नेतृत्त्वाखाली शुक्रवारी (२७ जून) दुपारी बाराच्या सुमारास आंदोलन करण्यात आले.
कात्रज-कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे, तसेच आमदार साहेब स्टंटबाजी बंद करा, असे फलक लावून शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना रस्त्याचे काम पाहण्यास मज्जाव केला. त्या वेळी पोलिसांनी त्यांना घोषणबाजी न करता निघून जाण्यास सांगितले. शहरात प्रतिबंधात्मक आदेश असताना आंदोलन केल्याप्रकरणी मोरे यांच्यासह २५ ते ३० कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक शेंडे तपास करत आहेत.