पुणे: कल्याणीनगर येथील अपघाताच्या घटनेनंतर पुणे पोलिसांनी शहरात ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह विरोधात कारवाईला सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या लक्ष्मी रोडवर वाहतूक पोलिस ड्रंक अॅण्ड ड्राईव्हची कारवाई करीत होते. त्यावेळी एका दुचाकी चालकाला पोलिसांनी चौकशीकरिता ताब्यात घेतले असता, त्या तरुणाने तो राग मनात धरून वाहतूक पोलिस कर्मचार्‍यावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. आरोपी संजय फकिरा साळवे (रा.पिंपरी चिंचवड) या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

या घटनेबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या वरीष्ठ निरीक्षक दिपाली भुजबळ म्हणाल्या की, आम्ही दररोज लक्ष्मी रोडवरील बुधवार चौक येथे ड्रंक अॅण्ड ड्राईव्हची कारवाई करत आहोत, त्यानुसारच काल देखील बुधवार चौक येथे सायंकाळी पाच ते साडे आठ वाजण्याच्या सुमारास आमची कारवाई सुरू होती. त्यावेळी आरोपी संजय फकिरा साळवे हा दुचाकी चालवित आला. पण तो संशयास्पद वाटल्याने वाहतूक पोलिसांनी चौकशीकरिता त्याला बाजूला घेतले आणि वाहतूक पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आले.

हेही वाचा : हडपसर पोलीस ठाण्यातून पसार झालेल्या सोनसाखळी चोर महिलेला छत्रपती संभाजीनगरला पकडले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर आरोपी संजय फकिरा साळवे हा पाणी प्यायचे असल्याचे सांगून बाहेर पळून गेल्याची घटना घडली. त्या आरोपीचा आसपासच्या भागात शोध घेतला. मात्र तो सापडला नाही. त्यानंतर आरोपी संजय साळवे हा तासाभरानंतर वाहतूक विभागाच्या कार्यालयात येऊन तुमच्या अंगावर आता पेट्रोल टाकून मारून टाकणार असे म्हणत, आरोपीने बाटलीतील पेट्रोल महिला पोलिस आणि इतर कर्मचार्‍यांच्या अंगावर टाकले. तर दुसर्‍या हातातील लायटरने पेटवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बाजूला असलेल्या महिला पोलिस अधिकाऱ्यांनी आरोपीचा हात पकडला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. तर या प्रकरणातील आरोपी संजय साळवे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.