पुणे : पुणे शहरातील शनिवारवाडय़ात चार दिवसापूर्वी मुस्लिम महिलांनी नमाज पठण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, काल दुपारच्या सुमारास भाजपच्या नेत्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी हिंदुत्ववादी संघटनेतील कार्यकर्त्यांसह शनिवारवाडय़ात प्रवेश करून आंदोलन केले. मुस्लिम महिलांनी ज्या ठिकाणी नमाज पठण केले होते. त्या जागेवर जाऊन ती जागा गोमूत्र शिंपडून आणि शेणाने सारवून ती जागा शुद्ध केली. त्यानंतर शिववंदना देखील म्हणण्यात आल्यानंतर, शनिवारवाडा परिसरात असलेली मजार काढून टाकण्यात यावी,अशी मागणी मेधा कुलकर्णी यांनी पोलिस प्रशासनाकडे केली. तसेच नमाज पठण करणाऱ्या महिलांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी पोलिस प्रशासनाकडे केली.

भाजपच्या नेत्या खासदार मेधा कुलकर्णी यांच्या आंदोलनाला २४ तास होत नाही तोवर अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारवाडा परिसरात मेधा कुलकर्णी यांच्या आंदोलनाच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. त्यावेळी हिंदु,मुस्लिम, ख्रिश्चन समाजातील नागरिक देखील आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.

यावेळी रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या, शनिवारवाडा परिसरात येऊन खासदार मेधा कुलकर्णी यांनी काल स्टंटबाजी केली.त्या विरोधात आम्ही आज निषेध आंदोलन करीत आहोत,मेधा कुलकर्णी या एक जबाबदार लोकप्रतिनिधी असून त्यांनी हिंदु आणि मुस्लिम या दोन्ही समाजात तेढ निर्माण करणार कृत्य केल आहे.त्या कृतीच आम्ही निषेध व्यक्त करीत आहोत,तसेच पुणे शहरातील समाजिक सलोखा बिघडवणे,या सर्व कृत्यामुळे मेधा कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा,अशी आमची मागणी आहे.

तसेच त्या पुढे म्हणाल्या, शनिवारवाडा परिसरातील मजार काढण्यात यावी,अशी मागणी मेधा कुलकर्णी यांनी केली.पण मी मेधा कुलकर्णी यांना एक सांगू इच्छिते की,1936 मध्ये या मजार ची नोंद आहे.त्यामुळे ही मजार काढून टाकण्यात यावी,अशा प्रकारची विधान एका जबाबदार लोकप्रतिनिधी असणार्‍या मेधा कुलकर्णी यांना शोभत नसून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी देखील त्यांनी केली.