पुणे : विसर्जन मिरवणुकीत काही मंडळांनी लवकर सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांच्या दृष्टीने सर्व मंडळे सारखीच आहेत. उत्सव शांततेत आणि निर्वघ्नपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे. पुण्यातील कार्यकर्ते सुज्ञ आहेत. मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या सूचना विचारात घेऊन विसर्जन मिरवणुकीबाबत आठवडभरात निर्णय घेण्यात येईल’, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मंगळवारी दिली.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून मंगळवारी बालगंधर्व रंगमदिरात बैठकीचे आयोजन करण्यात आले. या वेळी पोलीस आयुक्त अमितेशकुमार बोलत होते. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश बनसाेडे, मनोज पाटील, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख यांच्यासह वरिष्ठ पाेलीस अधिकारी या वेळी उपस्थित होते. अग्निशमन दल, महावितरण, तसेच विविध शासकीय विभागातील अधिकारी बैठकीस उपस्थित होते. या बैठकीत विविध प्रमुख मंडळांच्या ५०० पदाधिकारी उपस्थित होते.

विसर्जन मिरवणूक यंदा सकाळी सात वाजता सुरू करण्याची मागणी काही मंडळांनी केली आहे. अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळाने यंदा विसर्जन मिरवणुकीत लवकर सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. विसर्जन मिरवणुकीतील सहभागावरुन विविध मंडळांच्या कार्यकर्त्यामध्ये मतभेद निर्माण झाले आहे. यापूर्वी पोलीस आयुक्तालयात मानाच्या मंडळांसह विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली हाेती. त्या वेळी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी विसर्जन मिरवणुकीबाबत समन्वयाने मार्ग काढू, असे जाहीर केले होते. त्याअनुषंगाने मंगळवारी झालेल्या बैठकीत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

ते म्हणाले, ‘पोलिसांच्या दृष्टीने सर्व मंडळे सारखीच आहेत. पुण्यातील गणेशाेत्सवाला महत्त्व आहे. मंडळांचे कार्यकर्ते सुसंस्कृत आहे. विसर्जन मिररवणुकीबाबत मंडळांमध्ये मतभेद किंवा विसंवाद असल्याचे कळाल्यानंतर खंत वाटली. प्राणप्रतिष्ठापना सोहळा ते विसर्जन मिरवणुकीदरम्यान बंदोबस्ताची आणखी करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन, महापालिका, पोलीस, तसेच विविध यंत्रणा एकत्र येऊन काम करत आहेत. उत्सव शांततेत पार पाडणे हे उद्दिष्ट आहे. विसर्जन मिरवणुकीबाबत मंडळांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या सूचना विचारात घेऊन गणेशोत्सवापूर्वीच पोलीस सर्व मंडळांशी समन्वय साधून सर्वांच्या हिताचा निर्णय घेतील.’

नियमावलीचे पालन आवश्यक

मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याच्या बळावर उत्सव शांततेत पार पडेल. उत्सवावर निर्बंध नको, अशी पोलिसांची भूमिका आहे. मात्र, कार्यकर्त्यांनी न्यायालयाच्या आदेश आणि नियमावलीचे पालन करणे गरजेचे आहे. शहरात अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेर बसविण्यात आले आहेत. गैरप्रकार रोखणे, तसेच संभाव्य अनुचित घटनांच्या पार्श्वभूमीवर मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मंडप परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. पोलिसांनी हे कॅमेरे (फिड) पोलीस नियंत्रण कक्षाशी जोडावेत. मंडपाच्या परिसरातील गर्दी, वाहतूक नियोजन करण्यासाठी हे कॅमेरे पोलिसांना उपयुक्त ठरतील. उत्सवाच्या कालावधीत होणारी गर्दी, तसेच चेंगराचेगरी, वाहतूक काेंडीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी स्थानिक पोलीस ठाण्यांच्या मदतीने आतापासून पाहणी करावी. गर्दी आणि कोंडीचे भाग निश्चित करुन उपाययोजना कराव्यात’, अशा सूचना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिल्या.

सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्म यानी प्रास्ताविक केले. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त ऋषीकेश रावले यांनी आभारप्रदर्शन केले. पोलीस उपायुक्त मिलिंद माेहिते, संभाजी कदम, डाॅ. संदीप भाजीभाकरे, डाॅ. राजकुमार शिंदे, सोमय मुंडे या वेळी उपस्थित होते.

प्रशासनाला सहकार्य करावे’

‘गणेशोत्सव राज्य उत्सव म्हणून जाहीर करण्यात आला आहे. उत्सवासाठी पोलीस, प्रशासन एकत्र येऊन काम करत आहे. प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.

उत्सवातील दहा दिवस मंगलमय असतात. उत्सवातील दिवस भारावलेले असतात. उत्सवात शिस्त हवी. मंडळांच्या कार्यकर्त्यानी सूचना जरूर कराव्यात. मात्र, प्रशासनावर अविश्वास ठेवू नये. उत्सवापूर्वी महापालिकेकडून सर्व कामे करण्यात येत आहे. रस्ते दुरुस्तीबाबत काही सूचना असल्यास ‘रोडमित्र’ ॲपवर द्याव्यात’. असे आवाहन महाालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी केले.

मद्य विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई

उत्सवाच्या कालावधीत प्रशासनाने मद्य विक्रीस बंदी घातली आहे. प्राणप्रतिष्ठापना सोहळा, विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी मद्यविक्रीची दुकाने बंद असतात. विसर्जन मिरवणुकीत कोणी छुप्या पद्धतीने मद्य विक्री करत असल्याचे आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिला. मिरवणुकीत काेणी मद्यप्राशन करुन आल्यास कार्यकर्त्यांनी त्याला रोखावे, असे त्यांनी सांगितले.