scorecardresearch

“दादा हिमालयात जाणार असतील तर मीही…”, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर जयंत पाटलांचा खोचक टोला

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकासआघाडीचा विजय झाल्यानंतर जयंत पाटलांनी चंद्रकांत पाटलांना खोचक टोला लगावला.

jayant patil on chandrakant patil
जयंत पाटील यांचा चंद्रकांत पाटलांना खोचक टोला!

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकासआघाडीच्या नेतृत्त्वात काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा विजय झाला. या निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हिमालयात जाईल या विधानावर जोरदार राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली. “चंद्रकांत पाटील हिमालयात जाणार असतील, तर मी देखील त्यांच्यासोबत जाईल,” असं म्हणत जयंत पाटलांनी चंद्रकांत पाटलांना खोचक टोला लगावला. ते शनिवारी (१६ एप्रिल) पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

जयंत पाटील म्हणाले, “मी आज चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मतदारसंघात आढावा घेण्यासाठी आलोय. त्यांनी कोल्हापूर मागेच सोडलंय, पण मी कोथरूडमधील कार्यकर्त्यांशी संवाद केला. त्यावरून चंद्रकांत पाटील यांना हाही मतदारसंघ सोडावा लागेल इतकं त्यांच्याविषयी प्रेम आपुलकी येथे दिसत आहे.”

“चंद्रकांत पाटील हिमालयात जाणार असतील, तर मीही…”

“पराभव एका मताने केला काय आणि हजार मतांनी केला काय, पराभव हा पराभव असतो. चंद्रकांत पाटलांना निवडणुकीला उभं राहण्याची संधी होती, पण असो. चंद्रकांत पाटील हिमालयात जाणार असतील, तर मीही जाईन. माझी देखील हिमालयात जाण्याची इच्छा आहे. चंद्रकांत पाटलांचे आणि माझे चांगले संबंध आहेत,” असं म्हणत जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला.

हेही वाचा : “…मात्र, बंटी पाटील सर्वांना पुरून उरले”, बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल

“राज्यात जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांना निकालाने चपराक”

“कोल्हापूर पोटनिवडणुकीचा जसा तुम्हाला आनंद झाला आहे, तसा मला देखील झाला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीने एकसंघ पद्धतीने काम केलं आहे. पुरोगामीत्वाकडे महाराष्ट्र झुकलेला आहे याचे हे द्योतक आहे. करवीरनगरीने दिलेला निकाल मार्गदर्शक आहे. राज्यात जातीय तेढ निर्माण करण्याचे काम काही लोक करतात. त्यांना या निकालाने चपराक मिळाली आहे,” असंही जयंत पाटलांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jayant patil comment on chandrakant patil statement of himalaya after defeat pbs

ताज्या बातम्या