टोळक्यांच्या अंतर्गत वादातून आतापर्यंत पाच ते सहा खुनाच्या प्रयत्नांच्या घटना
काळेवाडी येथील जोतिबा उद्यानाचे काम पूर्ण होऊन एक वर्ष झाले असले तरी हे उद्यान अद्याप महापालिकेकडे हस्तांतरित झालेले नाही. उद्यानाला पवना नदीच्या बाजूने सीमाभिंत नसल्यामुळे नागरिकांसाठी ते असुरक्षित बनले आहे. या उद्यानात टोळक्यांच्या अंतर्गत वादातून आतापर्यंत पाच ते सहा खुनाच्या प्रयत्नाच्या घटना घडल्या आहेत. एक खासगी सुरक्षा रक्षक येथे सुरक्षेसाठी नियुक्त करण्यात आला आहे. मात्र, त्यालाही टोळक्यांकडून धमक्या देणे, मारहाण अशा घटना घडत आहेत. उद्यानाच्या सुरक्षिततेकडे वेळीच लक्ष द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेने काळेवाडी येथील पवनानगर भागात ५ ते ६ एकर जागेवर मोठे उद्यान विकसित केले आहे. उद्यानात विविध प्रकारचे वृक्षारोपण करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना हे उद्यान आकर्षित करते. मात्र, पवना नदीच्या निळ्या रेषेत असल्यामुळे उद्यानाला पवना नदीच्या कडेने सीमाभिंत बांधण्यात आलेली नाही. त्याचा फायदा गुन्हेगारांकडून घेतला जातो. संध्याकाळी उद्यानामध्ये अश्लील चाळे करणाऱ्या जोडप्यांची संख्या वाढत आहे. यामुळे उद्यानात विरंगुळा म्हणून येणाऱ्या महिलांना त्रास सहन करावा लागतो. उद्यानात मद्यपान करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. सायंकाळी मद्यपान करुन दारुच्या बाटल्या जागेवरच फेकून दिल्या जातात. येथील साफसफाईची कामे करणारे कामगार सकाळी त्या बाटल्या उचलून फेकून देतात. या उद्यानामध्ये हे सर्व प्रकार नित्याचे झाले आहेत.
उद्यानामध्ये आलेल्या तरुणांच्या टोळक्यांमध्ये वादावादी होण्याचे प्रकारही नेहमीच घडतात. उद्यानामध्ये गेल्या दोन वर्षांत पाच ते सहा खुनाच्या प्रयत्नाचे प्रकार घडले.
गुन्हेगारांमध्ये होत असलेले वाद खुनाचा प्रयत्न करण्यापर्यंत जात आहेत. उद्यानामधील स्थापत्याची कामेही निकृष्ट दर्जाची झाली आहेत. सुशोभीकरणासाठी तयार केलेली भिंत पडली आहे. या पडलेल्या भिंतीमध्ये सिमेंट आणि वाळूपेक्षा मातीचे प्रमाण जास्त दिसत आहे. उद्यान पालिकेकडे हस्तांतरित झाले नसल्यामुळे महापालिकेने सुरक्षा रक्षक दिलेला नाही.
उद्यानाला सीमाभिंत नसल्यामुळे अनेक गुन्हेगारी स्वरुपाच्या घटना या उद्यानात घडतात. महापालिकेने या प्रकारांकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे.
प्रदीप पाटील, काळेवाडी
उद्यानाचे काम पूर्ण होऊन एक वर्ष झाले आहे. मात्र, अजूनही उद्यान पालिकेकडे हस्तांतरित झालले नाही. त्यामुळे खासगी सुरक्षारक्षक ठेवण्यात आला आहे. गुन्हेगारांकडून त्यालाही धमक्या दिल्या जातात. नशापानासारखे प्रकार गेले जातात.
दीपक आहेर, पवनानगर, काळेवाडी