पुणे : जिल्ह्यातील अनेक भागांना गेल्या दोन दिवसांमध्ये झालेल्या पावसाने झोडपून काढले आहे. जिल्ह्यातील ५५ महसूल मंडळांमध्ये ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली. जिल्ह्यातील १६३ कुटुंबांमधील ६३२ व्यक्तींना पावसाचा फटका बसला असून, त्यांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले. अतिवृष्टीमुळे शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथील कामिनी नदीला पूर आल्याने रांजणगाव-निमगाव रस्त्यावरील पुलावरून एक तरुण बुडाल्याची घटना घडली.

जिल्ह्यात रविवारी सायंकाळपासून पावसाला सुरुवात झाली. सोमवारी रात्रभर अनेक तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी ८६२ मिलिमीटर एवढा पाऊस पडतो. तर जून ते ऑक्टोबर या कालावधीत पावसाची सरासरी ९४० मिलिमीटर अशी आहे. मात्र, जून महिन्यापासून आतापर्यंत ७४५ मिलिमीटर पावसाची नोंद जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली.

गेल्या दोन दिवसांमध्ये झालेल्या पावसाचा सर्वाधिक फटका हवेली, पुरंदर, बारामती, इंदापूर तालुक्यामधील गावांना बसला आहे. या तालुक्यांमध्ये शंभर मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद गेल्या दोन दिवसांमध्ये झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली. जिल्ह्यातील ५५ मंडळांमध्ये ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला असल्याचेही सांगण्यात आले.

पावसामुळे अपर लोणी काळभोर तालुक्यातील मौजे थेऊर येथील रुके वस्ती येथील ४३ कुटुंबांतील १५२ व्यक्तींचे पावसामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेत स्थलांतर करण्यात आले. इंदापूर तालुक्यातील सणसर येथील १२० कुटुंबांतील ४८० व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख विठ्ठल बनोटे यांनी दिली.

अतिवृष्टीमुळे शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथील कामिनी नदीला पूर आल्याने रांजणगाव-निमगाव रस्त्यावरील पुलावरून सोमवारी रात्री आठ वाजता सूरज अशोक राजगुरू (वय ३०) हा तरुण वाहून गेला. त्याचा आपदा मित्र, स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शोध घेण्यात आला. मंगळवारीही शोध घेण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.