पुणे : कोथरूड गोळीबार प्रकरणातील आरोपी नीलेश घायवळ याचे पारपत्र रद्द करण्याची विनंती पोलिसांनी शुक्रवारी विशेष न्यायालयाकडे केली. गोळीबार प्रकरणात अटकेत असलेल्या पाच आरोपींना विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यानुसार आरोपींची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
या प्रकरणात मयूर उर्फ राकेश गुलाब कुंबरे (वय २९), मयंक ऊर्फ माँटी विजय व्यास (वय २९), आनंद अनिल चांदलेकर (वय २४, तिघे रा. शास्त्रीनगर, कोथरूड), गणेश सतीश राऊत (वय ३२) आणि दिनेश राम फाटक (वय २८, दोघे रा. संत ज्ञानेश्वर कॉलनी, कोथरूड) यांना अटक करण्यात आली आहे. टोळीप्रमुख नीलेश बन्सीलाल घायवळ (वय ४९, रा. शास्त्रीनगर, कोथरूड), मुसाब इलाही शेख (वय ३३, रा. सिद्धीविनायक कॉलनी, कोथरूड), अक्षय दिलीप गोगावले (वय २९, रा. बोराटे चाळ, कोथरूड), जयेश कृष्णा वाघ (वय ३५, रा. केळेवाडी, कोथरूड), रोहित विठ्ठल आखाडे (वय २९, रा. गुरुजन सोसायटी, कोथरूड) यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
काेथरूडमधील शास्त्रीनगर परिसरात १७ सप्टेंबर रोजी दुचाकीला जाण्यास जागा न दिल्याने घायवळ टाेळीतील गुंडांनी एका तरुणावर पिस्तुलातून गोळीबार केला होता. त्यानंतर आरोपींनी एका तरुणावर कोयत्याने वार करून दहशत माजविली होती. या प्रकरणी पोलिसांनी घायवळसह साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केली होती.
‘घायवळ परदेशात पसार झाला असून, त्याने बनावट नावाने पारपत्र काढले आहे. त्याचे पारपत्र रद्द करावे,’ अशी विनंती सरकार पक्षाने शुक्रवारी न्यायालयात केली. त्यानंतर घायवळचे पारपत्र रद्द करण्याबाबतच्या कायद्यातील तरतुदी पोलिसांनी न्यायालयासमोर मांडाव्यात, अशी सूचना न्यायालयाने केली. या प्रकरणात अटक केलेले आरोपी कुंबरे, व्यास, राऊत, चांदलेकर, फाटक यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानुसार आरोपींची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली.
दरम्यान, घायवळ सध्या युराेपात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. घायवळला पकडण्यासाठी पुणे पोलिसांनी ‘लूक आऊट’ नोटीस बजाविली आहे. तसेच, आता या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबतचे शुक्रवारी आदेश दिले. या प्रकरणातील ‘मकोका’ कारवाईचा तपास सुरुवातीला कोथरूड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त भाऊसाहेब पटारे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. त्यानंतर आता या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्याकडे सोपविण्याचा आदेश देण्यात आला आहे.
सचिन घायवळविरुद्धही ‘मकोका’
नीलेश घायवळचा भाऊ सचिन याच्याविरुद्ध ‘मकोका’ कारवाई करण्यात आली आहे. कोथरूड भागात नव्याने बांधण्यात आलेल्या एका इमारतीतील दहा सदनिका जबरदस्तीने बळकावल्याप्रकरणी नीलेश घायवळ याच्यासह पिस्तूल परवान्यावरून चर्चेत असलेला त्याचा भाऊ सचिन घायवळ याच्यासह इतर सात जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नीलेश घायवळविरुद्ध आतापर्यंत पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.