पुणे : ‘शेतकऱ्यांवर लाठीमार करणे, शेतकऱ्याचा जीव जाणे हे काही मान्य नाही,’ अशी स्पष्ट भूमिका राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी मांडली. बावनकुळे पुण्यातील एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत होते. त्या वेळी पुरंदर येथील विमानतळाच्या भूसंपादनासाठी सुरू करण्यात आलेल्या ड्रोन सर्वेक्षणाला स्थानिकांनी केलेल्या विरोधावेळी झालेल्या लाठीमाराबाबत त्यांना विचारले असता, ते बोलत होते.
ते म्हणाले, ‘मी भूसंपादनाचा मंत्री आहे. याबाबतचे प्रश्न माझ्यासमोर आल्यास ते सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. गरज पडल्यास मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावण्यात येईल.’
जातनिहाय जनगणना २०२७ मध्ये
जातनिहाय जनगणना कधी होणार, याबाबत केंद्र सरकारने अद्याप स्पष्टता दिलेली नसताना राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी २०२७मध्ये जातनिहाय जनगणना होणार असल्याची माहिती दिली. ‘नरेंद्र मोदी यांनी जात जनगणनेचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे, त्याचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल,’ असेही त्यांनी नमूद केले. महाराष्ट्रातील प्रत्येक भटक्या जमातीतील नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. असे ते म्हणाले.