शहरातील प्रमुख रस्त्यांवर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. तरीही, अवजड वाहनचालकांच्या बेदकारपणामुळे महिनाभरात १८ जणांचे बळी गेले. आधीच वाहतूक कोंडीमुळे होणारी घुसमट आणि त्यात अवजड वाहनांचा बेदरकारपणा, यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या बेदरकारपणाला वेसण घालण्याची वेळ आता आली आहे. त्यासाठी कठोर कारवाईचीच मात्रा लागू पडेल.

पुणे शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस जटील होत चालली आहे. त्यामुळे पोलिसांनी शहरातील प्रमुख रस्ते निश्चित करून तेथे महापालिकेची मदत घेऊन रस्तेविषयक सुधारणांची कामे हाती घेतली. नगर रस्ता, सोलापूर रस्त्यांसह विविध रस्त्यांची पाहणी केली. वाहतूक कोंडी दूर करून वाहतुकीचा वेग वाढविण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या. वाहनचालकांची कोंडीतून सुटका करण्यासाठी विविध कामे करण्यात आली. मात्र, याच रस्त्यांवर गंभीर अपघात होत आहेत. कोथरूडमध्ये दोन महिन्यांपूर्वी शाळकरी मुलासह निघालेल्या दुचाकीस्वार महिलेला पाठीमागून भरधाव मोटारीने धडक दिली. या अपघातात शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. अशाच प्रकारची घटना नगर रस्ता परिसरातील खराडी बाह्यवळण मार्गावर घडली. भावाला शिकवणीला घेऊन निघालेल्या दुचाकीस्वार तरुणीला पाठीमागून येणाऱ्या डंपरने धडक दिली. अपघातात शाळकरी मुलाचा मृत्यू झाला.

आठवड्यापूर्वी वाढदिवस साजरा करून बाणेर भागातून निघालेली दुचाकीस्वार संगणक अभियंता आणि सहप्रवासी मैत्रिणीला डंपरने धडक दिली. वाढदिवसाच्या दिवशी दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघातापूर्वी मार्केट यार्डातील गंगाधाम चौकात मालवाहू ट्रकने सिग्नलला थांबलेल्या दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी विवाहित तरुणीचा मृत्यू झाला. या अपघातात तिचे सासरे गंभीर जखमी झाले. विश्रांतवाडी भागात एका महाविद्यालयीन युवतीचा सिमेंट मिक्सरच्या धडकेत मृत्यू झाला, तसेच येरवडा भागात विरुद्ध दिशेने आलेल्या डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला.

गंभीर अपघातांच्या या घटना वाढत असताना गुरुवारी (२६ जून) काळजाला चटका लावणारी घटना सिंहगड रस्ता भागातील तुकाईनगर परिसरात घडली. तुकाईनगर परिसरात भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार महाविद्यालयीन युवती सई श्रीकांत भागवत (वय १९) हिचा मृत्यू झाला. बंदी आदेश धुडकावून हा ट्रक निघाला होता. युवतीचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर हळहळ व्यक्त करण्यात आली.

शहरातील विविध रस्त्यांवर अवजड वाहनांना बंदी घालण्यात असली, तरी बंदी आदेश धुडकावून डंपर, ट्रक, सिमेंट मिक्सर सर्रास भरधाव जातात. बहुतांश अपघात वेग आणि अवजड वाहनचालकांच्या चुकीमुळे झाल्याचे पोलिसांचे निरीक्षण आहे. अशा प्रकारच्या वाहनांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. अपघात करणारे वाहन जप्त करण्याच्याही सूचना त्यांनी केल्या आहेत.

या बंदीला आता मालवाहतूकदारांनी विरोध केला आहे. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांविरुद्ध कारवाई करू नये, अशी वाहतूकदार संघटनेची मागणी आहे. मागणी रास्त असली तरी, शहरात गेल्या काही दिवसांत घडलेले बहुतांश अपघात अवजड वाहनचालकांच्या चुकांमुळे घडले आहेत, याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. अपघातात बळी पडणाऱ्या व्यक्तीचे कुटुंबीय, तसेच सामान्य नागरिकांच्या भावना, रोष जाणून घ्यावा लागणार आहे.

वेगाला वेसण घालण्यासाठी पोलिसांनी कडक कारवाई करावी. या कारवाईत सातत्य असायला हवे. ज्या भागात अपघात घडले आहेत, अशा अपघातस्थळांची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना करणेही गरजेचे आहे. अर्थात, कारवाई हा एक उपाय झाला. पण, अपघात रोखण्यासाठी डंपर, ट्रक, सिमेंट मिक्सरच्या मालकांनी त्यांच्या चालकांना सूचना देणेही गरजेचे आहे. स्वयंंशिस्त, वेगावर नियंत्रण ठेवणे, तसेच वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास शहरातील गंभीर अपघातांचे प्रमाण निश्चितच कमी होईल. त्यासाठी वाहतूक पोलीस, प्रादेशिक परिवहन विभागाने विविध यंत्रणांशी समन्वय साधून अपघात रोखण्यासाठी व्यापक मोहीम हाती घ्यावी. या मोहिमेत सर्वांना सहभागी करून घेणे गरजेचे ठरणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

rahul.khaladkar@expressindia.com