देशात इथेनॉल निर्मितीला आणि वापराला चालना देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सातत्याने प्रयत्न करत आहेत. पेट्रोल किंवा डिझेलऐवजी वाहनांमध्ये इथेनॉलचा वापर करावा, यासाठी नितीन गडकरी योजना आणण्याच्या तयारीत आहेत. पण इथेनॉल म्हणजे नेमकं काय? आणि याची निर्मिती कशी होणार? याचा वापर कसा केला जाणार? असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहेत, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं नितीन गडकरींनी ‘लोकसत्ता’च्या इथेनॉल परिषदेत दिली आहेत.
‘इथेनॉल’चं महत्त्व समजावून सांगत असताना त्यांनी आपण विदर्भात चार साखर कारखाने सुरू करून चूक केली, अशी कबुलीही त्यांनी यावेळी दिली. ‘लोकसत्ता इथेनॉल परिषदे’त नितीन गडकरी म्हणाले की, देशाच्या जीडीपीमध्ये शेतीचे योगदान १२ ते १३ टक्के आहे. गावात सुविधा नसल्याने ३० टक्के लोकसंख्या गावातून शहरात आली. हे स्थलांतर थांबवण्यासाठी कृषी, ग्रामीण, आदिवासी क्षेत्रासाठी जल, जमीन, जंगल धर्तीवर व्यवस्था उभारणे आवश्यक आहे. देशात साखरेचे अतिरिक्त उत्पादन होतं. यंदा ३८० लाख टन उत्पादन झालं. हे गरजेपेक्षा १०० टन अधिक उत्पादन आहे. साखर उद्योगाचे भविष्य चांगले आहे, पण त्यासाठी इथेनॉलचे उत्पादन वाढवावे लागेल. केवळ साखर निर्मिती केल्यास साखर कमी दराने विकावी लागेल. इथेनॉलला प्राधान्य न दिल्यास साखर उद्योगाचे भविष्य वाईट आहे. मी विदर्भात चार साखर कारखाने सुरू करून चूक केली आहे, अशी कबुली नितीन गडकरींनी यावेळी दिली.
गडकरी पुढे म्हणाले की, साखरेचे रुपांतर इथेनॉलमध्ये केले पाहिजे. देशात अन्नधान्याचे उत्पादन इतके अतिरिक्त आहे की ठेवायला जागा नाही. अन्नधान्याचे उत्पादन कमी झाल्यास विचार करावा लागेल. पण अन्नधान्यापासून इथेनॉल करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर पडीक जमिनीवर मोठ्या प्रमाणात बांबू लावल्यास प्रदूषणाची समस्या कमी होईल. आसाममध्ये बांबूपासून इथेनॉलची निर्मिती होते. पण त्याचा भांडवली खर्च जास्त आहे. तो खर्च कमी व्हायला हवा.
इथेनॉल आणि पेट्रोलचे मायलेज सारखेच आहे. बजाज, हिरो, टीव्हीएस आदि कंपन्यांनी पूर्ण इथेनॉलवर चालणाऱ्या दुचाकी तयार केल्या आहेत. पेट्रोलपेक्षा इथेनॉल चांगलं आणि स्वस्त आहे. त्यामुळे इंधन म्हणून इथेनॉलचा वापर झाला पाहिजे, असं प्रतिपादन नितीन गडकरींनी केले.