Maharashtra State Medical Competitive Online Exam 2025 Dates Schedule: पुणे : राज्यातील वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय व दंत महाविद्यालय तसेच संलग्नित रुग्णालयांमधील गट-क तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी सुरू असलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धा परीक्षा पुढे ढकलण्याचा आदेश वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिला आहे.

राज्यातील अनेक भागांत मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या अती मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या आपत्कालीन परिस्थितीमुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचणे पावसामुळे जिकिरीचे व अडचणीचे ठरले होते. या अनुषंगाने सर्व परीक्षार्थीचे पुढील होणारे नुकसान टाळण्यासाठी वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री मिसाळ यांनी तत्काळ परीक्षा पुढे ढकलण्याचे आदेश दिले.

वैद्यकीय शिक्षण व आयुष आयुक्तालयाने जारी केलेल्या सूचनेनुसार, २५ व २६ सप्टेंबर २०२५ रोजी होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. या संदर्भातील सुधारीत वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध केले जाणार असल्याचे आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे. उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर अद्ययावत माहिती तपासत राहावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

एमपीएससीही पुढे ढकलणार

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी सरकारकडे केली आहे. त्यांनी म्हटले आहे की,राज्यभरात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिकदृष्ट्या मोठे नुकसान झाले आहे. वाचनालये बंद असून अभ्यासाच्या साहित्याचे देखील नुकसान झाले आहे. याखेरीज वाहतूक व्यवस्था देखील विस्कळीत असून अनेक ठिकाणी वाहने पोहोचू शकत नाहीत अशी स्थिती आहे. याच परिस्थितीत २८ सप्टेंबरला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) राज्यसेवा परीक्षा होणार आहे.

सद्यःस्थितीत मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेत पोहोचणे शक्य होईल अशी शक्यता नाही. ही परीक्षा काही काळासाठी पुढे ढकलावी आणि परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर ती घेण्यात यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. माझी शासनाला विनंती आहे की, कृपया आपण विद्यार्थ्यांचे म्हणणे लक्षात घेऊन कृपया परीक्षा पुढे ढकलण्याच्या संदर्भाने निर्णय घ्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.