पुणे : ‘स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घेण्यासाठी प्रभाग रचना करण्याबाबतच्या निवडणूक आयोगाच्या निकषांकडे दुर्लक्ष करून सत्ताधारी भाजपच्या मंत्र्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी महापालिकेतील अधिकाऱ्यांवर दबाव टाकून प्रभागरचना केली आहे. नियम डावलून करण्यात आलेल्या या प्रभाग रचनेवर नगरविकास विभाग, निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात येणार असून, वेळप्रसंगी न्यायालयातदेखील दाद मागू,’ असा इशारा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शनिवारी दिला.

महाविकास आघाडीत सहभागी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), काँग्रेस, शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या शहराध्यक्षांनी पत्रकार परिषदेत हा आरोप केला. ‘राष्ट्रवादी’चे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेनेचे संजय मोरे, गजानन थरकुडे या वेळी उपस्थित होते.

जगताप म्हणाले, ‘प्रभागरचना करताना मुख्य रस्ता, नदी, नाले, ओढे यांचा विचार करून प्रभागाच्या हद्दी निश्चित करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या होत्या. मात्र, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासनावर दबाव टाकून प्रभागांची तोडफोड केली आहे. भाजपला पोषक होईल, अशा पद्धतीने प्रभागरचना करण्यात आली आहे. सर्किट हाउस येथे बसून भाजपच्या माजी सभागृह नेत्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या मर्जीने प्रभागरचना करण्यात आल्याची माहिती आहे. ही प्रभागरचना प्रसिद्ध झाल्यानंतर हरकती नोंदवून नगरविकास विभागाकडे तक्रार नोंदविली जाणार आहे. तसेच, वेळप्रसंगी न्यायालयात दाद मागणार आहोत.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘प्रभागरचनेबाबत चर्चा करण्यासाठी वेळ द्यावी, अशी मागणी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे करण्यात आली होती. मात्र, महाविकास आघाडीच्या एकाही पदाधिकाऱ्याला चर्चेसाठी वेळ देण्यात आला नाही. यावरून सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर किती दबाव आहे, हे लक्षात येते,’ असा आरोप शिंदे यांनी केला.

प्रभागरचना करताना महापालिकेतील अधिकाऱ्यांनी पक्षपातीपणा केल्याचा आरोप संजय मोरे, गजानन थरकुडे यांनी केला. ‘या चुकीच्या कामाबद्दल त्यांना भविष्यात त्रास होणार आहे, हे लक्षात ठेवावे. या विरोधात महाविकास आघाडी लढा देणार आहे,’ असेही त्यांनी सांगितले.