पुणे पोलिसांनी अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांना राहण्यासाठी जागा देणाऱ्या कोंढवा येथील एकास दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले असता ५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा आणि सत्र न्यायाधीश व्ही. एस. कचरे यांनी दिले.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अब्दुल कादीर दस्तगीर पठाण (वय ३२, रा, कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. कोथरूड पोलिसांच्या पथकाने मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान (वय २३), मोहम्मद युसूफ मोहम्मद याकूब साकी (वय २४, दोघेही रा. चेतना गार्डन, मिठानगर, कोंढवा. मूळ रा. रतलाम, मध्यप्रदेश) यांना  दुचाकी चोरीच्या संशयातून पकडण्यात आले होते. घराची झडती घेतल्यानंतर त्यांचे दहशतवादी संबंध पुढे आले होते.

हेही वाचा >>> ‘आयसिस’ कनेक्शन प्रकरणी पुण्यातल्या डॉक्टरला अटक, एनआयएची कारवाई

मोहम्मद खान आणि मोहम्मद साकी हे जयपूर बॉम्बस्फोटामधील फरार आरोपी आहेत. यांच्यावर एनआयने गुन्हा दाखल केल्यानंतर हे दोघे मार्च २०२२ मध्ये  मुंबईतील भेंडीबाजार येथे पळून आले होते. मुंबईत पकडले जाण्याच्या भीतीने हे दोन्ही दहशतवादी पुण्यात आले होते. ते पुण्यातील कौसर भाग येथील एका मशीदमध्ये राहू लागले. तेव्हा त्यांची ओळख अब्दुल कादीर दस्तगीर पठाण याच्याशी झाली. या दोन्ही दहशतवाद्यांनी आम्ही गरीब असून कामाच्या शोधात आलो असल्याचे सांगितले.

हेही वाचा >>> बारा वर्षाच्या मुलास कबुतराची विष्ठा खायला लावण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस; सराईत गुन्हेगारासह चौघांवर गुन्हा दाखल

अब्दुल कादीर दस्तगीर पठाण हा कोंढवा भागात राहत असून त्याच्या ग्राफिक्स डिझाईनचा व्यवसाय आहे. अब्दुल पठाणने  मोहम्मद खान आणि मोहम्मद साकी यांना ग्राफिक्स डिझाईनचे काम देतो असे सांगितले. त्यांना महिन्याला आठ हजार रुपये पगार दिला. तसेच अब्दुल पठाण याने चेतना गार्डनमधील अन्वर अली इद्रिस यांच्या मालकीची एक खोली भाड्याने घेऊन या दहशतवाद्यांना राहायला दिली. या खोलीचे ३ हजार ५०० रुपये भाडे अब्दुल या दोघांकडून घेत असे. दरम्यान, सहायक पोलिस आयुक्त अरूण वायकर यांनी न्यायालयात सांगितले की, मोहम्मद खान आणि मोहम्मद साकी या दोघांची पार्श्वभूमी अब्दुल पठाण याला माहीत होती. त्याने मागचे दीड वर्ष या दोघांना आसरा दिला. स्वतः १० बाय १२ च्या खोलीत राहून तो यांना कसा काय पैसे देत होता. त्यांना कुठल्या संघटना, संस्था तसेच आणखी कोण मदत करत होते याचा तपास करण्यात येणार आहे. विशेष सरकारी वकील म्हणून विजय फरगडे यांनी काम पाहिले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra ats arrests man in kondhwa for giving shelter to two terrorists pune print news vvk 10 zws
First published on: 27-07-2023 at 21:45 IST