पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (राज्य मंडळ) अध्यक्षपदी पहिल्यांदाच आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. यशदामध्ये कार्यरत असलेले सनदी अधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांच्याकडे आता राज्य मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
राज्य मंडळ ही शिक्षण विभागातील स्वायत्त संस्था आहे. राज्य मंडळ विभागीय मंडळाच्या माध्यमातून दहावी-बारावीच्या परीक्षा राज्य मंडळामार्फत घेतल्या जातात. राज्य मंडळाच्या आजवरच्या इतिहासानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शिक्षण सेवेतून आलेल्या अधिकाऱ्याची राज्य मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली जाते.
त्यानुसार शरद गोसावी यांनी राज्य मंडळाचे अध्यक्ष म्हणून तीन वर्षे काम केले. त्यानंतर त्यांची बदली प्राथमिक शिक्षण संचालक पदी करण्यात आली. त्याशिवाय त्यांच्याकडे राज्य मंडळाच्या अध्यक्षपदाचा गेल्या वर्षभरापासून अतिरिक्त कार्यभारही होता. त्यामुळे गोसावी यांनी राज्य मंडळ आणि प्राथमिक शिक्षण विभागाची दुहेरी जबाबदारी सांभाळली आहे.
या पार्श्वभूमीवर, आता यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) येथे उपसंचालक म्हणून कार्यरत असलेले सनदी अधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांची आता राज्य मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे राज्य मंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच सनदी अधिकारी अध्यक्षपदी काम करणार असल्याचे दिसून येत आहे.
राज्य मंडळातर्फे वर्षातून दोन वेळा दहावी, बारावीच्या परीक्षा घेतल्या जातात. दहावी-बारावीचे मिळून सुमारे ३२ लाख विद्यार्थी फेब्रुवारी-मार्चमध्ये होणारी परीक्षा देतात. तर जून-जुलैमध्ये होणारी पुरवणी परीक्षा सुमारे ६ लाख विद्यार्थी देतात.
राज्य मंडळाने अलीकडेच दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत इयत्ता बारावीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत, तर माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेसह प्रात्यक्षिक, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या कालावधीत घेतली जाणार आहे.
दहावीची लेखी परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत, तर शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र व गृहशास्त्र विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेसह प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २ ते १८ फेब्रुवारी या दरम्यान होणार असल्याचे राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्याच्या दृष्टीने दहावी-बारावीच्या परीक्षा अत्यंत संवेदनशील असतात. या परीक्षांमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य मंडळाकडून सातत्याने उपाययोजना करण्यात येतात. त्यामुळे परीक्षेच्या तोंडावर नव्या अधिकाऱ्याकडे राज्य मंडळाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
