गणरंगी रंगण्यासाठी आता अवघी सप्ताहाची प्रतीक्षा

सुखकर्त्यां गणरायाच्या उत्सवासाठी अवघी पुण्यनगरी सज्ज झाली असून, गणरंगी रंगून जाण्यासाठी आता अवघ्या सप्ताहाची प्रतीक्षा उरली आहे

गणेशोत्सव जेमतेम सात दिवसांवर आल्यामुळे शहरातील गणेश मंडळांकडून मंडप उभारणी आणि देखाव्यांचे काम जोरात सुरू आहे.

मंडप आणि देखावे उभारणीचे काम जोरात सुरू

सुखकर्त्यां गणरायाच्या उत्सवासाठी अवघी पुण्यनगरी सज्ज झाली असून, गणरंगी रंगून जाण्यासाठी आता अवघ्या सप्ताहाची प्रतीक्षा उरली आहे. घरोघरी आणि मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून गणरायाच्या आगमनाची तयारी सुरू आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाची शतकोत्तर रौप्यमहोत्सवपूर्ती यंदा धूमधडाक्यात आणि पारंपरिकतेचा बाज सांभाळून साजरी होणार आहे. विविध गणेश मंडळांच्या मंडप उभारणीचे आणि देखावे साकारण्याचे कामही जोरात सुरू आहे.

पुण्यनगरीच्या गणेशोत्सवाचा जगभरात लौकिक आहे. या लौकिकाला साजेसा उत्सव साजरा करत असताना यंदाच्या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सवाला शतकोत्तर रौप्यमहोत्सव पूर्तीची आनंदाची किनार लाभली आहे.  दरवर्षी स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम झाला, की कार्यकर्त्यांना गणेशोत्सवाचे वेध लागण्यास सुरुवात होते. दहीहंडी उत्सव ही गणेशोत्सवाची नांदी समजली जाते.

नियमावलीचे पालन करून मंडपाचा आकार, महापालिका, पोलीस प्रशासन आणि महावितरण अशा विविध विभागांचे परवाने या तांत्रिक गोष्टींची पूर्तता करण्याबरोबरच मंडप उभारणी आणि यंदाच्या वर्षी साकारण्यात येणाऱ्या देखाव्याचे काम अशा दोन पातळय़ांवर सध्या कार्यकर्ते काम करत आहेत. गणेशोत्सवात मंडळांना बॉक्स कमानी उभारण्यास मान्यता द्यायची की नाही, याबाबत गेला आठवडाभर सुरू असलेला वादही बुधवारी संपला. उत्सवाच्या काळात मंडळांना कमानी उभारण्यास मान्यता दिली जाईल, असे जाहीर करण्यात आल्यामुळे मंडळांची प्रमुख मागणी मान्य झाली.

यंदाची वैशिष्टय़े

* अनेक मंडळांचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवपूर्ती वर्ष.

*  पौराणिक, ऐतिहासिक, वैज्ञानिक विषयांवरील देखावे यंदाही साकारणार.

*  समाजातील विविध प्रश्न हाताळणारे जिवंत देखावेही पाहायला मिळणार.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mandap and the construction of the scenes began loudly