पुणे :‘गणेशोत्सवाला राज्य शासनाने ‘राज्य महोत्सव’ जाहीर केल्यानंतर यंदाचा गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी रूपरेषाही निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार शहरातील गणेशोत्सव भक्तांसाठी २४ तास खुला राहावा; तसेच संपूर्ण निर्बंधमुक्त करावा, यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार आहे,’ अशी माहिती कसबा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार हेमंत रासने यांनी दिली. ‘राज्य सरकारकडून अनेक कार्यक्रम आणि भरघोस निधीची घोषणा करण्यात आल्याने आगामी उत्सव धुमधडाक्यात साजरा होईल,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
‘शहरातील गणेशोत्सव २४ तास खुला राहावा, धर्म, संस्कृती, परंपरा जपून उत्सव साजरा करणे, उत्सव काळात सार्वजनिक सेवा आणि उपाहारगृहे २४ तास खुली राहावीत, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलिसांची संख्या वाढवून निर्बंधमुक्त आणि भयमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याला प्राधान्य राहील,’ असे रासने यांनी सांगितले.
कसबा मतदारसंघातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शनिवार वाडा ते स्वारगेट आणि सारसबाग ते शनिवार वाडा असा भुयारी मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून या भुयारी मार्गाचा सविस्तर प्रकल्प आरखडा (डीपीआर) करण्याचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. एका महिन्याभरामध्ये याचे काम पूर्ण होऊन, पुढील प्रक्रियेला सुरुवात होईल, असा दावा रासने यांनी केला. तसेच, राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या विस्ताराला गती देण्यासही मान्यता मिळाल्याची माहिती त्यांनी दिली.
ते म्हणाले, ‘कसबा मतदारसंघात अभ्यासिकांच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा देणारे हजारो विद्यार्थी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहतात. परीक्षेची तयारी करताना त्यांना अनेकदा समस्यांना सामोरे जावे लागते. त्यातील एक म्हणजे आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचा निकाल वेळेवर न लागणे अथवा या निकालाच्या प्रक्रियेला विलंब होणे. या संदर्भात विधिमंडळाच्या अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडण्यात आली होती.’
‘शंभर कोटींचा निधी उपलब्ध करणार’
ऐतिहासिक परंपरा असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला ‘राज्य उत्सव’ म्हणून मान्यता देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी त्याबाबतची घोषणा गेल्या काही दिवसांपूर्वी विधानसभेत केली होती. गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा द्यावा, अशी मागणी कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी केली होती. त्याला प्रतिसाद देऊन मंत्री शेलार यांनी त्याबाबतची घोषणा केली होती. तसेच, उत्सव अधिक भव्य स्वरूपात साजरा होण्यासाठी शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.