पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. रूपेश मोरे, असं मुलाचं नाव आहे. रूपेश मोरेच्या नावानं बनावट विवाह प्रमाणपत्र बनवून ३० लाख रूपयांची खंडणी मागितली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी भारती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यावर आता वसंत मोरे यांनी भाष्य करत संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे.

वसंत मोरे म्हणाले, “७ फेब्रवारीपासून माझ्या मुलगा रूपेशला व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटिंग केलं जात होतं. त्याचं बोगस लग्नाचं प्रमाणपत्र तयार करून ३० लाख रुपयांची खंडणी मागितली गेली. चार-पाच दिवस हा प्रकार सुरु राहिला. नंतर बंद झाला. त्यासंदर्भात भारती पोलीस ठाण्यात अर्ज दिला होता. पण, २७ फेब्रुवारीपासून पुन्हा रोज मेसेज सुरू झाले.”

हेही वाचा : “आमदार सोडून जातील म्हणून…”, अजित पवारांचं नगरमध्ये विधान

“यापूर्वीचे नंबर महाराष्ट्रातील नसल्याने काळजीचे कारण वाटलं नाही. परंतु, आताचे मेसेज येणारे पाच-सह नंबर महाराष्ट्रातील आहे. आमचं फार्महाऊस नावावर कर नाहीतर, तुझं सर्व व्हायरल करू अशा धमक्या दिल्या जात आहेत. विवाहाचे तयार केलेलं प्रमाणपत्रही बोगस आहे. वडगाव येथे हे तयार केलं असून, अल्फिया नावाच्या तरुणीशी रुपेशचं लग्न झाल्याचं प्रमाणपत्रात दाखवलं आहे,” असं वसंत मोरेंनी सांगितलं.

“या सर्व गोष्टी गंमत म्हणून ठिक होत्या. पण, गेल्या चार-पाच दिवसांपासून तुझ्या डोक्यात गोळ्या घालणार, त्यासाठी चार माणसे नेली आहेत. खराडी पोलीस ठाणे मॅनेज केलं आहे. खराडीत एक इनोवा कार दाखवली आहे. त्यात ३० लाख रूपये आणून ठेव. हलक्यात घेऊ नको. नाहीतर तुला समजेल. निवडणुकीच्या वेळी पाहून घेऊ, अशा धमक्या येत होत्या,” अशी माहिती वसंत मोरेंनी दिली.

हेही वाचा : “तू आमदार निवडून दिला असता, तर कशाला…”, भर सभेत समोरून आलेल्या प्रश्नावर अजित पवारांची टोलेबाजी!

“यासंदर्भात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलीस चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. माझा पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. मात्र, असा कोण खोडसाळपणा करत असेल किंवा जाणूनबुजून आम्हाला डिवचण्याचा प्रकार होत असेल, त्याच्यावर पोलीस कारवाई करतील. आमचा कायदासुव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे,” असं वसंत मोरेंनी म्हटलं.