मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा सणाच्या निमित्ताने मुंबईत झालेल्या जाहीर सभेत अनेक मुद्यांना हात घालत, राज्य सरकारवर सडकून टीका केली होती.पण त्या जाहीर सभेत मशीदीवरील भोंगे न काढल्यास,तिथे हनुमान चालीसा लावू असे विधान केले होते.राज ठाकरे यांच्या त्या विधानानंतर राजकीय वर्तुळात अनेक आरोप प्रत्यारोपना सुरुवात झाली आहे.त्याच दरम्यान पुण्यातील वॉर्ड क्रमांक ८४ आणि प्रभाग क्रमांक १८ मधील मनसेचे शाखा अध्यक्ष माजीद शेख या पदाधिकाऱ्याने राज ठाकरे यांच्या ‘त्या’ विधानानंतर राजीनामा दिला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या राजीनाम्या बाबत शाखा अध्यक्ष माजीद शेख यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, मी २००९ पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच काम करत असून मी शाखा अध्यक्ष आहे. माझ्या प्रभात हिंदू मुस्लीम एकत्रित राहतात. मी माझ्या भागात पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे.पण गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांनी सभेत घेतलेल्या भूमिकेबाबत नागरिकांमध्ये नाराजी असून त्यामुळे मी शहर अध्यक्ष आणि विभाग अध्यक्ष यांच्याकडे राजीनामा दिला असल्याचे त्यांनी सांगितले.