पुणे : पुणे महापालिकेचे आयुक्त आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान बुधवारी कार्यकर्ते आयुक्तांच्या अंगावर धावून जाण्यात झाले. ‘कार्यकर्ते निवेदन देण्यासाठी नाही, तर आणखी वेगळ्या उद्देशाने आले होते,’ असा आरोप आयुक्तांनी केला, तर आयुक्तांनी गुंड म्हटल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला. महापालिकेच्या आवारात सुमारे तीन तास हा गोंधळ सुरू होता. या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी काम बंद आंदोलन करणार आहेत.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम बुधवारी दुपारी शहर स्वच्छतेबाबत बैठक घेत होते. त्या वेळी मनसेचे माजी नगरसेवक किशोर शिंदे शिष्टमंडळासह आयुक्त कार्यालयात आले. महापालिका आयुक्तांच्या बंगल्यातून गायब झालेल्या वस्तूंच्या प्रकरणी निवेदन देण्यासाठी हे पदाधिकारी आले होते. मात्र, कार्यालयात बैठक सुरू असल्याने त्यांना भेट नाकारण्यात आली. त्यामुळे शिंदे यांच्यासह संतापलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी बैठक सुरू असलेल्या सभागृहात प्रवेश करून, ‘आयुक्तांच्या बैठकीसाठी आम्ही थांबायचे का,’ असा प्रश्न विचारला. त्यावर आयुक्तांनी, ‘तुमचे निवेदन द्या, मग बघू,’ असे त्यांना सांगितले.

आयुक्तांनी हे हिंदीत सांगितल्याने चिडलेले शिंदे यांनी, ‘मराठीत बोला, नाही तर तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर पाठवून देऊ,’ असे आयुक्तांना म्हटले. त्यानंतर आयुक्त आणि किशोर शिंदे यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाला. त्याचे पर्यवसान अंगावर धावून जाण्यामध्ये झाले. ‘शिंदे आणि त्यांच्याबरोबर आलेले कार्यकर्ते निवेदन देण्यासाठी नाही, तर विशिष्ट उद्देशाने आले होते,’ असा आरोप महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पत्रकारांशी बोलताना केला. तर, ‘आयुक्त आम्हाला गुंड म्हणाले असून, त्यांनी धमकी दिली,’ असा दावा शिंदे यांनी केला.

या घटनेनंतर निवेदन देण्यासाठी आलेले मनसेचे पदाधिकारी आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलनास बसले. काही वेळातच आयुक्तांच्या दालनाबाहेर मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते जमा झाले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे महापालिकेची सगळी प्रवेशद्वारे बंद करण्यात आली. मनसेचे काही कार्यकर्ते महापालिका इमारतीच्या चौथ्या मजल्यापर्यंत पोहोचले आणि त्यांनी आयुक्तांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. यामुळे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्तही तैनात करावा लागला. दुसरीकडे, दरवाजे बंद केल्याने अनेक कर्मचारी महापालिकेतच अडकून पडले. रात्री उशिरापर्यंत हा गोंधळ सुरू होता.

महापालिकेची पोलिसांकडे तक्रार

महापालिका आयुक्तांना निवेदन देताना गोंधळ घातल्याप्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध बुधवारी रात्री उशिरा महापालिकेचे अधिकारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेले. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी फिर्याद नोंदविण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.