केसरी-मराठा संस्थेच्या वतीने प्रसिद्ध लेखक अतुल देऊळगावकर यांच्या ‘पृथ्वीचे आख्यान’ या पुस्तकाला साहित्यसम्राट न. चिं. केळकर ग्रंथोत्तेजक पुरस्कार जाहीर झाला आहे. पाच हजार रुपये, सन्मानपत्र असे केळकर ग्रंथोत्तेजक पारितोषिकाचे स्वरूप आहे.न. चिं. केळकर यांच्या स्मृतिदनाचे औचित्य साधून दरवर्षी केळकर पुरस्कार प्रदान केला जातो. मात्र देऊळगावकर हे सध्या परदेशात आहेत. त्यामुळे पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचा तपशील नंतर जाहीर करण्यात येणार आहे, असे ‘केसरी’चे विश्वस्त-संपादक डॉ. दीपक टिळक यांनी कळविले आहे.

हेही वाचा >>>पुणे : २०१४ नंतर ‘आयुष’ जगभरात ; राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे मत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पर्यावरणवादी लेखक आणि विचारवंत असलेले देऊळगावकर विविध शासकीय आणि अशासकीय संस्थांच्या समित्यांवर कार्यरत आहेत. ‘हवामान बदल; आव्हाने आणि उपाययोजना’ या विषयावर त्यांनी राज्याच्या विधिमंडळ सदस्यांसमोर मार्गदर्शन केले आहे. हवामान आणि पर्यावरणविषयक विविध जागतिक परिषदांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. पर्यावरण, शेती, आपत्ती व्यवस्थापन, विकास, विज्ञान-तंत्रज्ञान या विषयांवर ते विविध माध्यमांतून विचार मांडत आहेत. ‘ग्रेटाची हाक : तुम्हाला ऐकू येतेय ना’, ‘डळमळले भूमंडळ’, ‘बखर पर्यावरणाची आणि विवेकी पर्यावरणवाद्याची’, ‘विवेकीयांची संगती’, ‘विश्वाचे आर्त’, ‘स्वामीनाथन-भूकमुक्तीचा ध्यास’ या पुस्तकांचे त्यांनी लेखन केले आहे. पर्यावरण आणि खगोलशास्त्रावरील त्यांची पुस्तके विशेष गाजली आहेत.