पुणे : ‘सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेवून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. शहरातील रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शहरातील महापालिकेच्या रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश संबधित विभागांना दिले आहेत,’ अशी माहिती महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली. महापालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी घेतल्यानंतर नवल किशोर राम यांनी सोमवारी महापालिकेतील विविध खात्यांचा आढावा घेतला. या वेळी विभागप्रमुखांनी त्यांच्यासमोर सादरीकरण केले. पुढील दोन दिवस हा आढावा घेतला जाणार आहे.

महापालिका आयुक्त म्हणाले, ‘रुग्णालयांमध्ये आवश्यक ती खबरदारी घेतली जात नसल्याने आग लागणे, अपघात होण्याचे प्रकार घडतात. या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयांनी आवश्यक नियमांचे पालन करून सुरक्षिततेच्या दृष्टिने त्याची पूर्तता केली आहे का? याची तपासणी होणे गरजेचे आहे. यासाठी शंभर टक्के फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या रुग्णालयांमध्ये नियमांची पूर्तता होत नाही, हे समोर येईल, त्यांना टाळे ठोकण्याचा इशाराही देण्यात आला आहे.’

‘दैनंदिन कामात न अडकता शहराच्या आणि नागरिकांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण ठरतील, अशा योजना सुरू करण्यावर आपला भर राहणार आहे. केवळ महापालिकेतील अधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या माहितीवर अवलंबून न राहता वेगवेगळ्या माध्यमांतून माहिती घेऊन नागरिकांच्या फायद्यासाठी उपक्रम राबविले जाणार आहेत. नागरिकांकडून तसेच विविध घटकांकडून माहिती घेत कामाचा प्राधान्यक्रम ठरविला जाणार आहे. प्रसंगी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट देण्यावर भर राहील,’ असे त्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘नदी सुधारणा, मेट्रो, जायका प्रकल्पांना प्राधान्य’

‘शहरात नदीसुधारणा योजनेचे काम गेले अनेक वर्षे सुरू आहे. ही शहरासाठी महत्त्वपूर्ण योजना असून, त्याचे काम संथ गतीने सुरू आहे. याबरोबर सक्षम सार्वजनिक वाहतुकीमध्ये मेट्रो प्रकल्पासह घनकचरा व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. या योजनांतून नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारणार असल्याने या प्रकल्पांची कामे प्राधान्याने मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे,’ असे आयुक्तांनी स्पष्ट केले.