पुणे : महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष यांची एकत्रित बैठक होईल. त्यानंतर दिल्ली येथे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक होऊन मग लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचे जागावाटप ठरेल, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बुधवारी केली. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
ते म्हणाले की, महाराष्ट्रातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघाची विद्यमान स्थिती, पक्षीय बलाबल आणि ताकद पाहून जागांची मागणी केली जाणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग, त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय तसेच आता पक्ष आणि निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी, संभाजी ब्रिगेडचे अनेक कार्यकर्ते यांचा पक्षप्रवेश होत आहे. याशिवाय महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधूनही राष्ट्रवादीमध्ये अनेक प्रवेश लवकरच होतील. त्यामुळे आम्ही घेतलेला निर्णय योग्य असल्याचे सिद्ध होत आहे. माझे बंधू आणि मी २०१४ पासून राजकारणातून वेगवेगळे झालो आहोत. त्यामुळे ते आताच सोडून गेले, अशा वदंता मुद्दामहून पसरवल्या जात आहेत. राजकारणामुळे कुटुंबात फूट पडणे हे भारतीय राजकारणात नवीन नाही, असेही तटकरे म्हणाले.
हेही वाचा : पिंपरी : मोरवाडीत औद्योगिक कचऱ्याला आग; सर्वत्र धुराचे लोट
‘आताच सर्व काही उघड करणार नाही’
शरद पवार यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांचा राजीनामा सर्वानुमते स्वीकृत करायचा. त्यांच्या जागी कोणाला नेमायचे आहे. त्याचे नावही एकमताने ठरविण्यात आले होते. सर्वकाही आनंदाने दिले असते त्याकरिता पक्ष आणि कुटुंब का फोडले?, असे म्हणणाऱ्यांना पक्षात राष्ट्रीय नेतृत्त्व करण्याची संधी दिली होती. त्यानंतरही पवार यांनी आपला राजीनामा मागे का घेतला?, कुठे आणि कधी काय-काय झाले याची सर्व माहिती मला आहे. मात्र, आताच सर्व काही उघड करणार नाही, असे तटकरे यांनी सांगितले. पक्षाची घटना, संघटना आणि आमदार आमच्यासोबत आहेत. त्यामुळे अदृश्य शक्ती म्हणणाऱ्यांकडे बोलण्यासारखे आणि करण्यासारखे काही नाही, अशा शब्दांत तटकरे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना फटकारले.
हेही वाचा : बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार नव्हे, ‘यांच्या’त होणार लढत, रोहित पवार यांचे मोठे विधान
सुनेत्रा पवारांनी बारामतीमधून लढावे
सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी मागणी मतदार संघातून, जनतेमधून आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांमधून होत आहे. हा मतदारसंघ गेली अनेक वर्षे राष्ट्रवादीकडे असल्याने या जागेची मागणी आम्ही करणार आहोत. महायुतीचे जागावाटप झाल्यानंतर बारामतीमधील उमेदवार जाहीर केला जाईल. कधीतरी पहिली निवडणूक लढवावी लागतेच, त्याशिवाय अनुभव कसा येणार?, सुप्रिया सुळे यांनी पहिली निवडणूक लढविली होती, तेव्हा त्यांच्याकडे तरी कुठे अनुभव होता, असाही टोला तटकरे यांनी खासदार सुळे यांना लगावला.