पिंपरी  : कोणीही पक्ष सोडून गेले तरी काय फरक पडत नाही. शरद पवार यांच्यासारखे मोठे विद्यापीठ आपल्याकडे आहे.  २५ वर्षांत पक्ष साडे सतरा वर्षे सत्तेत होता. अनेक संकटे आली, अनेकजण सोडून गेले. पण,  पवार साहेबांनी  पक्षाची नौका बुडू दिली नाही आणि भविष्यातही बुडणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या पिंपरीतील मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनानंतर झालेल्या सभेत पाटील बोलत होते. खासदार डॉ. अमोल कोल्हे, युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, माजी आमदार जयदेव गायकवाड, माजी महापौर आझम पानसरे, प्रशांत जगताप, शहराचे निरीक्षक प्रकाश म्हस्के यावेळी उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले की, गेलेल्यांचा विषय संपला आहे. त्यांची चिंता मी करत नाही. आपण घाबरायचे नाही, आपण होतो तिथेच आहोत. सत्ता येते आणि जाते त्याची कोणी चिंता करू नका, राज्यातील जनता शरद पवार यांच्यासोबत आहे. पिंपरी-चिंचवडचा विकास शरद पवार यांनी केला हे शहरातील जनतेला माहिती आहे. आगामी काळात महापालिकेत नवीन चेहरे आणण्याची अभूतपूर्व संधी आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नका, काम करत रहा,  माणसे जोडत रहावे. महाविकास आघाडी जनतेत लोकप्रिय आहे. महागाई, बेरोजगारी, बेकारी, महागाईने जनता त्रस्त आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांसह शहरात राहणारे नागरिकही विविध समस्यांनी त्रस्त आहेत. शहरातील अनधिकृत बांधकामे, रेडझोनचा प्रश्न सुटला नाही. प्रश्न सोडवू म्हणा-यांची मुदत संपत आली तरी प्रश्न का सुटला नाही असा जाब विचारला पाहिजे.

हेही वाचा >>>‘पिंपरीत घड्याळ, वेळ आणि मालकही तेच…’ , अशी घोषणाबाजी करत शरद पवार गटाचे जोरदार शक्तिप्रदर्शन!

शिवसेना पक्ष फोडला, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. दीड वर्षात दोन पक्ष फोडण्याचे पाप, कपटीपणा कोणी केला, हे जनतेच्या लक्षात येत आहे. अशा लोकांबाबत जनतेमध्ये घृणा निर्माण होत आहे. त्यामुळे आगामी काळात जनता त्यांना धडा शिकवेल असेही पाटील म्हणाले.  डॉ.अमोल कोल्हे म्हणाले की, रस्ते मोठे केले म्हणजे विकास होत नाही. विविध कंपन्या, माहिती तंत्रज्ञाननगरी आणत शहराच्या अर्थकारणाला शरद पवार यांनी चालना दिली. नदी सुधार प्रकल्पाचे काय झाले. इंद्रायणीमाईवर फेसाचा तवंग येत आहे. वारकऱ्यांनी कशाला नमन करायचे?शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आम्ही आंदोलन करत होतो.  आम्हाला कोणी सांगितले नव्हते. त्यावेळी तीन मे रोजी मला फोन करून आमचा कौटुंबिक प्रश्न आहे, तू आंदोलन करू नकोस, असा दम दिला होता असे सांगत मेहबुब शेख यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.

जोरदार शक्तिप्रदर्शन

घड्याळही तेच, वेळही तीच आणि मालकही तेच.. फक्त साहेब असा संदेश देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या  शहरात राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. त्यामुळे शहरात राष्ट्रवादीला चांगले दिवस येतील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मनस्ताप

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात कार्यालय उभारण्यात आले. या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी कार्यकत्यांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीमुळे पुण्याहून निगडीकडे जाणारा महामार्ग सायंकाळच्या वेळी काही काळासाठी बंद केला होता. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती.  वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागला.