पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून केलेले ‘फौजदाराचा हवालदार झाला’ हे वाक्य जिव्हारी लागल्यामुळेच त्यांच्यावर अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ची कारवाई सुरू करण्यात आल्याचा आरोप पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष इम्रान शेख यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अंमलबजावणी संचालनालय (ईडी) चौकशीच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पिंपरीत निदर्शने केली. या आंदोलनात देवेंद्र तायडे, राजन नायर, तानाजी खाडे, युवराज पवार, मीरा कदम, राजेंद्रसिंग वालिया आदी सहभागी झाले होते. ‘ईडी भाजपचा घरगडी’, ‘भाजप हमसे डरती है, ईडी को आगे करती है’, ‘भाजपचा हवालदार काय करतो, ईडीच्या नोटीस वाटत फिरतो’, ‘ईडी सरकार हाय हाय’ अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

हेही वाचा >>>पुणे: पादत्राणांचे ५५ जोड चोरणारे गजाआड

जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून केलेले ‘फौजदाराचा हवालदार झाला’ हे वाक्य जिव्हारी लागल्यामुळेच त्यांच्यावर अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ची कारवाई सुरू करण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. पाटील हे उच्चविद्याविभूषित,चारित्र्यसंपन्न आणि निष्कलंक नेते आहेत. त्यांचे ४० वर्षांचे सार्वजनिक व राजकीय जीवन हे एक खुले पुस्तक आहे. मात्र सध्या त्यांच्यावर राजकीय आकसाने ईडी कारवाई केली जाते. मागील ९ वर्षांत भाजपच्या एकाही आमदार-खासदारांना ईडीची नोटीस आली नाही; परंतु महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांना जाणून-मधून सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून त्रास देण्याचे काम हे सरकार करत असल्याचा आरोप शेख यांनी केला.