नारायणगाव : खासदार नीलेश लंके यांच्या संकल्पनेतील एक दिवस शिवरायांच्या गड, कल्ले आणि दुर्गांसाठी या मोहिमेचा रविवारी ( दि. १६ ) शिवजन्मभुमी असलेल्या शिवनेरीच्या पहिल्या पायरीचे दर्शन घेउन शुभारंभ करण्यात आला. या मोहिमेस खासदार नीलेश लंके यांच्या आवाहनानंतर शिवप्रेमींचा मोठा प्रतिसाद देत सहभाग घेतला .

राज्यातील धार्मिकता, एकता, अखंडता बंधुत्वास कुठेतरी बाधा पोहचत असल्याचे सध्या चित्र आहे. अनेक राजकीय मंडळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास चुकीच्या पध्दतीने मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभुमीवर खासदार नीलेश लंके हे अठरापगड जातीच्या मावळयांना एकत्र करून एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. या मोहिमेचा रविवारी शिवजन्मभुमी शिवनेरी येथे प्रारंभ करण्यात आला. विशेष म्हणजे खासदार नीलेश लंके यांनी अठरापगड जातीच्या मावळयांना सोबत घेतले त्यात मुस्लिम बांधवांचाही सहभाग लाभला .

सोमवारी तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. त्या पार्श्वभुमीवर आम्ही सर्व शिवभक्तांनी निर्धार केला आहे की, प्रत्येक महिन्याच्या रविवारी छत्रपतींच्या गड किल्ल्ल्यांच्या संवर्धनासाठी द्यावा. याच निर्धाराने आम्ही आज शिवनेरीवर आलेलो आहोत , पुढील स्वच्छता मोहिम अहिल्यानगर जिल्हयातील श्रीगोंदे तालुक्यातील धर्मवीर गडावर रविवार दि. १३ एप्रिल रोजी होणार असल्याचे यावेळी खासदार नीलेश लंके यांनी यावेळी जाहिर केले. 

दोन दिवसांत शेकडोंचा सहभाग

दोन दिवसांपूर्वी ऑनलाईन लिंकच्या माध्यमातून या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यास आठशे ते नऊशे लोकांचा प्रतिसाद मिळाला. नावनोंदणी व्यतिरिक्त अनेक शिवभक्त या मोहिमेत सहभागी झाले होते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक शिवभक्त त्यांच्या मुलांना घेऊन या मोहिमेत सहभागी झाले आहेत. मुंबई, ठाणे, सातारा, तुळजापूर, धाराशिव, नाशिक, पुणे आदी वेगवेगळया भागांतून या ठिकाणी अनेक शिवभक्त आल्याचे पहावयास मिळाले , मी शिवरायांचा मावळा आहे, त्यामुळे ही मोहिम म्हणजे कोणताही राजकीय स्टंट नसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व मावळयांनी राबविलेली स्वच्छता मोहिम आहे. या मोहिमेमागे कोणताही राजकीय हेतू असण्याचे कारणच नाही. ही मोहिम कोणास उत्तर देण्यासाठी किंवा कोणतीही राजकीय टिका टिपन्नी करण्यासाठी नाही. केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा समृध्द इतिहास आणि वारसा जतन व्हावा, तो जनतेला कळावा हाच या स्वच्छता मोहिमेमागचा हेतू आहे.

खासदार नीलेश लंके  लोकसभा सदस्य वन विभागाला डस्ट बिन

खासदार नीलेश लंके यांच्यासह त्यांचे सहकारी या मोहिमेत खोरे, टिकाव, कुऱ्हाड, डस्टबिन, बादली, झाडांच्या बुंध्याला लावण्यासाठीचे रंग सोबत घेत सहभागी झाले होते. यावेळी वन विभागाला नीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने डस्टबिन भेट देण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

( खासदार नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांच्या स्वच्छता मोहिमेस शिवजन्मभुमी असलेल्या शिवनेरी येथून रविवारी प्रारंभ करण्यात आला.)