पुणे : अयोध्येत बाबरी मशीद होती त्यावेळी आम्ही त्या ठिकाणी काय केले हे लक्षात आहे ना, आता त्या ठिकाणी भव्यदिव्य राम मंदीर उभारले जात आहे. आता मथुरेमध्येदेखील श्रीकृष्णाचे मंदीर उभारले जाणार आहे. त्यानंतर आता पुण्येश्वर मंदीर परिसरात असलेले मशिदीचे अतिक्रमण हटविले जाणार आहे. आता यापुढे अधिकार्यांना निवेदन द्यायचे नाही, तर थेट आतमध्ये घुसून मशिदीचे अतिक्रमण पाडायचे, असा इशारा भाजपाचे नेते आमदार नितेश राणे यांनी महापालिका प्रशासनाला दिला. पुणे शहरातील कसबा पेठ भागात असलेल्या पुण्येश्वर मंदिराच्या परिसरातील मशिदीचे अतिक्रमण हटविण्यात यावे. या मागणीसाठी पुण्येश्वर पुनर्निर्माण समितीच्या वतीने पुणे महापालिकेच्या बाहेर भाजपाचे नेते आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले. आमदार महेश लांडगे, समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यासह विविध हिंदू संघटनांचे प्रतिनिधी आंदोलनात सहभागी झाले होते. हेही वाचा - …अन पिंपरी महापालिकेला मिळाल्या पहिल्या महिला आयुक्त! नितेश राणे म्हणाले की, पुण्येश्वर मंदिराच्या परिसरात मशिदीचे अतिक्रमण करण्यात आले आहे. याबाबत अनेक वेळा आमच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे. त्या दरम्यानच्या कालावधीत त्या ठिकाणी चार मजली इमारत बांधली गेली होती. त्यावेळी महापालिका प्रशासनाचे अधिकारी काय करित होते. आम्ही कारवाईची मागणी केली की, आमच्या पदाधिकाऱ्यांना कायद्याचा धाक दाखविला जात आहे. आम्ही कायदे पाळणारे मंडळी असून आजपर्यंत कायदा पाळला आहे. हे पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी लक्षात ठेवावे. तसेच आपल्या देश हिंदूंचा असून तुम्ही कशाला जिहाद्यांचे लाड करता. तुम्हाला ते वाचविण्यास येणार नाहीत .मी आणि महेश लांडगे यांनी विधानसभेत थोबाड उघडले, तर तुमची खुर्ची वाचविण्यास कोणीही येणार नाही. प्रत्येक विधानसभा अधिवेशनात किमान दोन अधिकार्यांना निलंबित करण्याचा माझा आजपर्यंत स्ट्राईक रेट आहे आणि मी तेव्हाच घरी जातो, असा इशारा महापालिका अधिकाऱ्यांना त्यांनी दिला. हेही वाचा - सट्टेबाजीत हरलेले सहा लाख परत देण्यासाठी गॅरेजचालकाचे अपहरण, सट्टेबाजांना सोलापूरमधून अटक पुण्येश्वर मंदिराच्या परिसरात मशिदीचे अतिक्रमण हटविण्याबाबत महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर पावलं उचलावी, अन्यथा आम्ही यापुढील काळात अधिकार्यांना निवेदन किंवा आंदोलन करणार नाही, तर थेट मंदिर परिसरात मशिदीचे जे अतिक्रमण झाले आहे ते आम्ही पाडू. त्या घटनेला महापालिका प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा नितेश राणे यांनी दिला.