पुणे : रेल्वे गाड्या आणि स्थानकांमध्ये अनधिकृत फेरीवाले मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. या अनधिकृत फेरीवाल्यांकडून प्रामुख्याने खाद्यपदार्थांची विक्री केली जात आहे. हे खाद्यपदार्थ चांगल्या दर्जाचे नसल्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आता रेल्वे सुरक्षा दलासह वाणिज्य विभागाने अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई सुरू केली आहे. यामध्ये ५६० फेरीवाल्यांना पकडून त्यांच्याकडून तीन लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे.
मध्य रेल्वेमध्ये रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वेच्या वाणिज्य विभागाने गाड्या, स्थानके आणि फलाटावर अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध कारवाईची मोहीम राबवली. त्यात पुणे, दौंड, मिरज, सातारा, अहमदनगर, कोपरगाव, बेलापूर या प्रमुख स्थानकांवर कारवाई करण्यात आली. विनापरवाना खाद्यपदार्थ, बाटलीबंद पाणी विकणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाईचा दंडुका उगारण्यात आला.
हेही वाचा >>>दुर्मीळ विकारावर तरुणीची मात! हाडे निकामी करणाऱ्या अव्हॅस्क्युलर नेक्रॉसिसवर उपचार कसे होतात…
या मोहिमेमध्ये २७ एप्रिल ते १२ मे या कालावधीत ५६० फेरीवाल्यांना पकडण्यात आले. त्यातील ३५१ फेरीवाल्यांवर न्यायालयात खटला दाखल करून त्यांच्याकडून तीन लाख १७ हजार ४२५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच फेरीवाल्यांकडून एक हजार ९४५ पाण्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. याशिवाय रेल्वेच्या अधिकृत स्टॉलवर खाद्यपदार्थ आणि पाण्याच्या बाटल्यांची जास्त किमतीने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडून ६० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
हेही वाचा >>>जागतिक अब्जाधीशांच्या यादीत पुण्यातील उद्योजक! जाणून घ्या ‘केपीआयटी’चे रवी पंडित यांच्याविषयी…
वस्तूंची जास्त दराने विक्री
पुणे रेल्वे स्थानक परिसरात अनेक विक्रेते छापील कमाल किमतीऐवजी जास्त पैसे प्रवाशांकडून उकळत आहेत. त्याचबरोबर अनधिकृत कंपन्यांच्या उत्पादनांची विक्री केली जात असल्याच्या तक्रारी अनेक प्रवाशांनी केल्या आहेत. पाण्याच्या बाटलीची विक्रीही जादा दराने केली जात असल्याचे अनेक प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे प्रवाशांची लूट करणारे विक्रेते आणि फेरीवाले यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.