पीएमआरडीएच्या प्रारूप आराखडय़ावर हरकती नोंदवण्यासाठी आज शेवटचा दिवस

पीएमआरडीएकडून २ ऑगस्ट रोजी प्रदेश क्षेत्राचा प्रारूप विकास आराखडा जाहीर करण्यात आला.

४६ हजार हरकती, सूचना प्राप्त

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी- पीएमआरडीए) जाहीर के लेल्या प्रारूप विकास आराखडय़ावर आतापर्यंत ४६ हजार हरकती, सूचना आल्या आहेत. हरकती, सूचना नोंदवण्याची मुदत गुरुवारी (१६ सप्टेंबर) संपणार आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या हरकती, सूचना असल्यास त्या नोंदवाव्यात, असे आवाहन पीएमआरडीएकडून करण्यात आले आहे.

पीएमआरडीएकडून २ ऑगस्ट रोजी प्रदेश क्षेत्राचा प्रारूप विकास आराखडा जाहीर करण्यात आला. या आराखडय़ावर हरकती नोंदवण्याची मुदत एक महिना होती. महिनाभरात नागरिकांनी २६ हजार हरकती, सूचना नोंदवल्या होत्या.

त्यानंतर राज्य शासनाने हरकती नोंदवण्यास आणखी १५ दिवसांची मुदतवाढ दिली असून ही मुदत १६ सप्टेंबरला संपत आहे. आतापर्यंत ४६ हजार हरकती, सूचना प्राप्त झाल्या आहेत.

औंध येथील पीएमआरडीएचे मुख्य कार्यालय, आकुर्डी कार्यालय, वाघोली क्षेत्रीय कार्यालय, नसरापूर क्षेत्रीय कार्यालय (तलाठी कार्यालयाशेजारी), वडगाव मावळ क्षेत्रीय कार्यालय (जुनी पंचायत समिती इमारत) आणि पीएमआरडीए क्षेत्रातील नऊ तहसील कार्यालय या ठिकाणी हरकती, सूचना नागरिकांना नोंदवता येणार आहेत. तसेच    pmr.dp.planning@gmail.com या ई-मेवर देखील हरकती नोंदवता येतील. प्रारूप आराखडय़ावर हरकती, सूचना नोंदवण्याची मुदत गुरुवारी संपत असून ही मुदत वाढवण्याबाबत अद्याप राज्य शासनाकडून कोणत्याही प्रकारच्या सूचना प्राप्त झालेल्या नसल्याचेही पीएमआरडीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Objections pmrda draft outline ssh