पुणे : ‘देशावरील संकटकाळात संघर्ष करायची वेळ आली, तर सैन्य आणि नेतृत्व तो संघर्ष करील. ऑपेरशन सिंदूर हे त्याचे उदाहरण आहे,’ असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी केले. ‘युद्धनीतीचे काही नियम कधीच कालबाह्य होत नाहीत. बाजीराव पेशवे यांची युद्धनीती अंगीकारल्यास देशाच्या सीमा भविष्यातही सुरक्षित राहतील,’ असेही ते म्हणाले.
थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे खडकवासला येथील ‘एनडीए’मध्ये उभारण्यात आलेल्या थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावारण शहा यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
‘छत्रपती शिवाजी महाराजांनंतर धर्मवीर संभाजी महाराज, वीर ताराराणी, संताजी-धनाजी आदी अनेक वीरांनी स्वराज्याची ज्योत विझू दिली नाही. मराठा साम्राज्याचे दोन तुकडे झाल्यानंतर कठीण परिस्थिती निर्माण होईल, असे वाटत असातनाच पेशव्यांनी हिंदवी स्वराज्याची ज्योत तेवत ठेवली. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेली स्वातंत्र्याची लढाई पेशव्यांनी शंभर वर्षे लढली नसती, तर भारताचे मूळ स्वरूप टिकलेच नसते,’ असे शहा म्हणाले.
‘व्यूहरचना, वेग, सैन्याची समर्पण, देशभक्ती आणि बलिदानाची भावना या गुणांमुळेच सैन्याला विजयश्री मिळते. इतिहासाचा विद्यार्थी म्हणून विचार करता, गेल्या पाचशे वर्षांतील या सर्व गुणांचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून थोरले बाजीराव पेशवे यांचेच नाव समोर येते. त्यामुळेच लष्कराच्या तिन्ही दलांचे अधिकारी घडविणाऱ्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए)मध्ये थोरल्या बाजीराव पेशव्यांचा पुतळा उभारणे सर्वार्थाने योग्य जागा आहे.
‘एनडीए’मधून देशाच्या तिन्ही सशस्त्र दलांचे अधिकारी प्रशिक्षण घेतात. प्रशिक्षणादरम्यान बाजीरावांचा पुतळा, त्यांच्या जीवनकार्याचा अभ्यास करून तयार होणारे अधिकारी सैन्यात जातील, तेव्हा भारताच्या सीमांना स्पर्श करण्याचे धाडस कोणीही करणार नाही,’ असे शहा यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री, पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पेशव्यांचे वंशज पुष्करसिंह पेशवा,लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, एनडीएचे प्रमुख व्हाइस ॲडमिरल गुरुचरण सिंह,सिटी ग्रुपचे संचालक अनिरुद्ध देशपांडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (नि.), सचिव कुंदनकुमार साठे, माजी खासदार विनय सहस्रबुद्धे या वेळी उपस्थित होते. पुतळा उभारणीत योगदान देणारे देशपांडे, शिल्पकार विपुल खटावकर, वास्तुविशारद अभिषेक भोईर यांचा शहा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
‘महानायकांचा इतिहास पुसला’
‘देशातील नामांकित प्रबोधिनीत थोरले बाजीराव पेशवे यांचा पुतळा उभारण्यात आला आहे, ही आनंदाची बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी विजीगिषू वृत्तीने स्वराज्याची ज्योत सामान्य मराठी माणसाच्या रक्तात फुलविली. ती अखंडित ठेवून तिचा विस्तार करण्याचे महान कार्य श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांनी केले. सर्व दिशांना हिंदवी स्वराज्य स्थापन करीत असताना त्यांनी वेगाची रणनीती अवलंबिली. आज अनेक महानायकांचा इतिहास पुसला गेला आहे. श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या भव्य पुतळा उभारणीतून मराठ्यांचा उज्ज्वल इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचेल,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
हाच धागा पकडून अमित शहा म्हणाले, ‘देशासाठी समर्पण, बलिदान देणाऱ्या अनेक योद्ध्यांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने जगासमोर मांडला गेला, तसेच पुसलाही गेला. विकास आणि विरासत या पंतप्रधान मोदी यांच्या सूत्रातून प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचा, वीर योद्ध्यांचा खरा इतिहास जगासमोर यावा, यासाठी हा इतिहास भावानुवादित होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.’