विभक्त दाम्पत्यांच्या आडमुठेपणावर उपाय
पुणे : संसारातील कुरबुरी तसेच वादातून विभक्त होण्याचे प्रमाण सध्या वाढते आहे. अगदी किरकोळ कारणांवरून देखील एकमेकांपासून फारकत घेण्याच्या कटू निर्णयाप्रत दाम्पत्य येते. मात्र त्यांच्या या निर्णयामुळे मुलांची होरपळ होते. बाल्यावस्थेत ते आई-वडिलांच्या प्रेमाला पारखे होतात. मुलांचा ताबा आई किंवा वडिलांकडे असल्यास मुलांची भेट घेण्यासाठी दोघांना न्यायालयात अर्ज दाखल करावा लागतो. न्यायालयाने भेटीची परवानगी दिल्यानंतर मुलांना भेटण्यास मज्जाव किंवा टाळाटाळ करणाऱ्या पालकांना आता कौटुंबिक न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे चपराक बसली आहे.
समजा एखाद्या मुलाचा ताबा आईकडे असेल. तिने ठरल्यानुसार मुलाला वडिलांना भेटू न दिल्यास किंवा मुलांना भेटण्याची वेळ निश्चित केल्यानंतर एखादा पालक मुलांना भेटणे टाळत असेल तर त्यांना दंड मोजावा लागणार असल्याचे शिवाजीनगर कौटुंबिक न्यायालयाने दिलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे.
मुलांची भेट घेण्याची इच्छा असणारे अनेक पालक असतात. न्यायालयाने मुलांचा ताबा आई किंवा वडिलांकडे दिल्यास अशा प्रकरणात मुलांची भेट घ्यायची असल्यास न्यायालयात अर्ज दाखल करावा लागतो. अर्ज मंजूर झाल्यानंतर आई किंवा वडिलांना मुलांना भेटण्यास मज्जाव केला जातो. त्रास देण्यासाठी असे प्रकार केले जातात. मात्र अशा प्रकारच्या घटनांमुळे मुलांना आई-वडिलांच्या मायेपासून पारखे राहावे लागते. असे प्रकार वारंवार घडत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर कौटुंबिक न्यायालयाने दिलेला आदेश महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
मुलांचा ताबा दोघांकडे
मुलांवर एकाचा नाही तर दोघांचा ताबा राहील, असे आदेश यापूर्वी उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. या निकालाची अंमलबजावणी करत मुलांना त्यांचा हक्क मिळावा म्हणून असे निकाल देण्यात येत आहे. या निर्णयामुळे विभक्त झालेले पालक मुलांचे भवितव्य विचारात घेऊन एकत्र येण्याची शक्यता असते. मुलांना भेटण्याची इच्छा असताना केवळ एकमेकांना त्रास देण्यासाठी असे प्रकार केले जातात. मुलांना भेटू दिले जात नाही किंवा एखादा पालक जाणीवपूर्वक मुलांची भेट टाळतो.
अंमलबजावणी अशी..
वडिलांना शनिवारी मुलांचा ताबा द्यावा. रविवारी मुलाला पत्नीकडे सुपूर्द करावे. वाढदिवसाच्या दिवशी मुलगा दुपारी तीन ते पाच वाजेदरम्यान वडिलांकडे राहील, असे कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश एन. आर. नाईकवाडी यांनी आदेशात म्हटले आहे. मुलाचा ताबा दिला नाही किंवा वडील त्याला भेटायला आले नाहीत तर संबंधितांना दंड होईल. दंडाची रक्कम एकमेकांना द्यावी लागेल, असे निकालात नमूद करण्यात आले आहे.
निर्णय काय?
मुलांचा ताबा नसलेला पालक मुलांना भेटण्यास आल्यास त्याला भेटू न दिल्यास किंवा एखादा पालक आडमुठेपणा करीत मुलांना भेटण्यास टाळत असल्यास कौटुंबिक न्यायालयाने तीन हजार रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे आदेश शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयाने नुकतेच दिले आहेत. ज्या पालकांकडे मुलांचा ताबा नाही त्यांना मुलांचा सहवास हवासा वाटतो. न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.
मुलांना आई-वडिलांचा सहवास हवासा वाटतो. आई-वडिलांच्या नात्यात कटुता आली असली तरी त्यांना मायेपासून वंचित ठेवणे योग्य नाही. दाम्पत्याने त्यांचे वाद बाजूला ठेवून मुलांची जबाबदारी घ्यावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
– स्मिता जोशी, समुपदेशक, कौटुंबिक न्यायालय, शिवाजीनगर